Home
Home चंद्रपूर बल्लारपूरच्या एसएनडीटी उपकेंद्राचा ‘मॉडेल कॅम्पस’कडे प्रवास; जुलैपर्यंत कामे पूर्ण करण्याचे मुनगंटीवार यांचे...

बल्लारपूरच्या एसएनडीटी उपकेंद्राचा ‘मॉडेल कॅम्पस’कडे प्रवास; जुलैपर्यंत कामे पूर्ण करण्याचे मुनगंटीवार यांचे निर्देश

लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती

चंद्रपूर : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठ उपकेंद्राच्या विविध विकासकामांचा आढावा घेत संपूर्ण परिसर ‘मॉडेल कॅम्पस’ म्हणून विकसित करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. सर्व कामे निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जात पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देत विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, आधुनिक व सर्वसमावेशक सुविधा उभारण्यावर त्यांनी भर दिला.

आढावा बैठकीत कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव व कुलसचिव नांदावडेकर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, विद्यापीठ प्रशासन व संबंधित विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी मुनगंटीवार यांनी विविध बांधकामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्य इमारतीचे बांधकाम जूनपर्यंत, 100 केएलडी क्षमतेच्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटचे काम 30 जूनपर्यंत, गेस्ट हाऊस बिल्डिंगचे काम 30 मेपर्यंत, इनडोअर स्पोर्ट्स बिल्डिंग व सांस्कृतिक सभागृहाचे काम 30 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच 2 बीएचके क्वार्टर इमारतीचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याच्या सूचना देत पारंपरिक महिला खेळांसाठी मैदान विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. “मिशन ऑलिंपिक”च्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात सक्षम करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. स्विमिंग टँक दुरुस्ती, क्रीडा संकुल सक्षमीकरण व विविध क्रीडा प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला.

कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींसाठी आरओ पाणी व्यवस्था, अत्याधुनिक जिम, ॲक्युप्रेशर वॉकिंग ट्रॅक, तसेच सुमारे 900 विद्यार्थिनी क्षमतेचे भव्य सांस्कृतिक सभागृह उभारण्यात येत आहे. यासोबतच योगा हॉल, वसतिगृह, स्टेशनरी व प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.

कॅम्पसला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर रंगसंगती, एअरपोर्टसारखे अंतर्गत रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वॉटर हार्वेस्टिंग, थीम लाईटिंग व आधुनिक साउंड सिस्टीम उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच परिसरात इलेक्ट्रिक बस सुविधा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले.

सौंदर्यीकरणासाठी 400 प्रकारच्या फुलांचा बगीचा, बाराही महिने फुलणाऱ्या वनस्पती, ठिबक सिंचन व्यवस्था व आकर्षक एलिव्हेटेड वॉटर टँक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व उपक्रमांमुळे एसएनडीटी उपकेंद्र हे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक, प्रेरणादायी व आदर्श कॅम्पस म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here