Home
Home चंद्रपूर “उन्हाच्या तडाख्यात मुक्या जीवांसाठी पुढे या – दारात ठेवा पाण्याची वाटी”

“उन्हाच्या तडाख्यात मुक्या जीवांसाठी पुढे या – दारात ठेवा पाण्याची वाटी”

लोकदर्शन 👉 डॉ. नंदकिशोर मैंदळकर

चंद्रपूर: औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे वातावरण अधिकच तापले आहे. मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागला असून, या कडक उन्हाळ्याचा फटका केवळ माणसांनाच नव्हे तर मुक्या भटक्या प्राण्यांनाही बसत आहे.

माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही थंड पाण्याची आणि अन्नाची अत्यंत गरज असते. मात्र, हे मुके जीव आपली तहान किंवा भूक व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे ते गावोगावी आणि शहरात पाणी व चाऱ्याच्या शोधात भटकताना दिसतात. या परिस्थितीत प्रत्येकाने आपले सामाजिक कर्तव्य ओळखून भूतदया दाखविणे आवश्यक आहे.

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या घरासमोर पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. तसेच घरातील उरलेला भाजीपाला किंवा अन्न उकिरड्यावर न टाकता स्वच्छ जागी ठेवावा, जेणेकरून भटक्या प्राण्यांची भूक व तहान भागवता येईल.

उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक प्राणी मृत्युमुखी पडतात. ही बाब अत्यंत वेदनादायक असून, अशा वेळी त्यांना मदत करणे हीच खरी ईश्वरी सेवा ठरते. जसे माणसांसाठी पाणपोई लावल्या जातात, तसेच मुक्या प्राण्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

या छोट्या कृतीतून मोठा परमार्थ साधता येतो आणि एका जीवाचे प्राण वाचविण्याचे समाधान मिळते. हा आनंद कुठल्याही किंमतीत विकत मिळू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने पुढाकार घेऊन मुक्या प्राण्यांसाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here