Home
Home राजुरा जनगणना 2027 मधून महाविद्यालयीन शिक्षकांना वगळण्याची मागणी; गोंडवाना विद्यापीठाकडून जिल्हाधिकाऱ्यांना विनंती

जनगणना 2027 मधून महाविद्यालयीन शिक्षकांना वगळण्याची मागणी; गोंडवाना विद्यापीठाकडून जिल्हाधिकाऱ्यांना विनंती

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा : गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या पुढाकारातून जनगणना 2027 च्या कामकाजातून महाविद्यालयीन शिक्षकांना सहभागी करू नये, अशी महत्त्वपूर्ण मागणी विद्यापीठ प्रशासनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. संघटनेच्या निवेदनाची दखल घेत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या आदेशानुसार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना विद्यापीठाच्या वतीने विनंती पत्र सादर केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, बल्लारपूर, पोंभुर्णा तसेच इतर भागातील अनेक महाविद्यालयीन शिक्षकांना स्थानिक प्रशासनाकडून जनगणना 2027 मध्ये सहभागी होण्यासंदर्भात पत्रे देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने पुढाकार घेत शिक्षकांना शैक्षणिक कामकाजातून दूर ठेवणाऱ्या या निर्णयाबाबत विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

संघटनेने आपल्या निवेदनात जनगणना प्रक्रिया प्रदीर्घ कालावधीची असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. निवडणूक व इतर कारणांमुळे हिवाळी परीक्षा आधीच उशिरा झालेल्या असून जनगणना ड्युटीमुळे दुसऱ्या सत्राच्या परीक्षा वेळापत्रकात विलंब, पेपर मूल्यांकनात अडथळे आणि निकाल जाहीर करण्यात उशीर होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले.

याशिवाय सध्या महाविद्यालये नॅक मूल्यांकन आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत व्यस्त असल्याने शिक्षकांवर अतिरिक्त प्रशासकीय भार पडणार असल्याची बाब संघटनेने अधोरेखित केली. अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जनगणना कामकाजाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितावर विपरीत परिणाम होईल, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली होती.

या सर्व बाबींची दखल घेत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी तातडीने निर्णय घेत विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयीन शिक्षकांना जनगणना 2027 प्रक्रियेतून वगळण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या निर्णयाबद्दल संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव विवेक गोरलावार तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here