लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा, ता. प्र. : राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, ज्येष्ठ लोकनेते ॲड. विठ्ठलराव धोटे यांचे सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राजुरा विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ते चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती प्रतिभा धोटे, मुलगा, मुली, धोटे कुटुंबीय, आप्तेष्ट व मोठा जनसंपर्क परिवार असा शोकाकुल परिवार आहे.
स्व. ॲड. विठ्ठलराव धोटे यांचा जन्म ५ सप्टेंबर १९३४ रोजी झाला होता. त्यांनी सन १९६२ ते १९६७ आणि १९७१ ते १९७८ या कालावधीत एकूण १२ वर्षे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात वर्धा नदीवरील राजुरा–बल्लारपूर पुलाची उभारणी, कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम धरणांची निर्मिती, तसेच जिवती तालुक्याच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आले. स्थलांतरित नागरिकांच्या पुनर्वसनासाठीही त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नेतृत्व म्हणून स्व. धोटे यांची ओळख होती. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करत राजुरा विधानसभा क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही भरीव काम केले. सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत विकासकामांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीमुळे त्यांनी लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते.
स्व. ॲड. विठ्ठलराव धोटे यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ६ वाजता पेट वॉर्ड येथील त्यांच्या निवासस्थानावरून निघणार असून भवानी मंदिर, राजुरा येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





