लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती
राजुरा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) हे बहुविषयक शिक्षणाच्या तत्त्वावर आधारित असताना गोंडवाना विद्यापीठात पदवी प्रथम वर्षासाठी केवळ दोन मेजर विषयांची मर्यादा घालण्यात आल्याने विद्यार्थी व शिक्षकांसमोर विविध समस्या निर्माण होत असल्याचा मुद्दा गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने उपस्थित केला आहे. प्रथम वर्षाला तीन मेजर विषयांची निवड विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने कुलगुरूंकडे केली आहे.
या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे आणि सचिव डॉ. विवेक गोर्लावार यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना निवेदन सादर केले. यावर सकारात्मक भूमिका घेत कुलगुरूंनी तत्काळ अंमलबजावणीसाठी समिती गठित करण्याच्या सूचना अधिष्ठाता मंडळाला दिल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या गोंडवाना विद्यापीठात प्रथम वर्षाला दोन मेजर विषयांवर आधारित अभ्यासक्रम राबविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विषय निवडीचे पर्याय मर्यादित होत असून अनेक विषयांमध्ये विद्यार्थी संख्या घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच काही प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
दरम्यान, Savitribai Phule Pune University आणि Swami Ramanand Teerth Marathwada University येथे प्रथम वर्षाला तीन मेजर विषयांची पद्धत यशस्वीपणे राबविली जात असल्याचा दाखला देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अधिक विषयांची निवड उपलब्ध झाल्यास पुढील वर्षांमध्ये मेजर-मायनर विषय निवडणे सुलभ होईल, तसेच स्पर्धा परीक्षा आणि सर्वांगीण विकासासाठी बहुविषयक ज्ञानाचा फायदा होईल, असे संघटनेचे मत आहे.
याशिवाय अतिरिक्त विषयांचे क्रेडिट अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये साठवून भविष्यात शैक्षणिक संधी वाढविता येऊ शकतात. विविध विद्याशाखांमध्ये प्रवेश घेताना नवीन विषय समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक पर्याय उपलब्ध होणे आवश्यक असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.
संघटनेने सुचविलेल्या प्रस्तावानुसार प्रथम वर्षाला तीन, द्वितीय वर्षाला दोन आणि तृतीय वर्षाला एक मेजर विषय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यामुळे प्राध्यापकांचा कार्यभार संतुलित राहील तसेच तृतीय वर्षापर्यंत विषयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या टिकून राहण्यास मदत होईल, असा दावा संघटनेने केला आहे.
गोंडवाना विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मूलभूत उद्दिष्टांनुसार अभ्यासक्रम संरचनेत तातडीने बदल करून प्रथम वर्षासाठी तीन मेजर विषयांची अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.





