Home
Home गडचांदूर / कोरपणा *मुहूर्तावर पार पडला विवाह सोहळा; बोरडे-वाढई परिवाराचा वेळेच्या नियोजनाचा आदर्श* *शिस्तबद्ध...

*मुहूर्तावर पार पडला विवाह सोहळा; बोरडे-वाढई परिवाराचा वेळेच्या नियोजनाचा आदर्श* *शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे कोरपना-राजुरा परिसरात विवाह सोहळ्याची विशेष चर्चा*

लोकदर्शन 👉जयंत जेणेकर

कोरपना : सध्या विवाह सोहळ्यांमध्ये तासन्‌तास विलंब, पाहुण्यांची गैरसोय आणि नियोजनाचा अभाव हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र कोरपना येथील बोरडे परिवार आणि राजुरा तालुक्यातील कळमना येथील वाढई परिवाराने वेळेचे काटेकोर पालन करत विवाह सोहळा नियोजित मुहूर्तावर पार पाडून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शिस्त, व्यवस्थापन आणि संस्कार यांचा सुंदर संगम असलेल्या या विवाह सोहळ्याची परिसरात विशेष चर्चा रंगत आहे.

कोरपना येथील श्रीमती कलावती व स्वर्गीय प्राचार्य गजाननराव बोरडे यांचे चिरंजीव चि. प्रतीक बोरडे (नायब तहसीलदार) यांचा विवाह कळमना (ता. राजुरा) येथील साधना ताई व पद्माकर वाढई यांची सुकन्या चि. सौ. कां. आचल यांच्यासोबत १० मे रोजी राजुरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या विवाह सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. माजी आमदार सुदर्शन निमकर व त्यांच्या सहचारिणी वर्षा निमकर यांनी विवाह अगदी मुहूर्तावर पार पडल्याबद्दल नवदाम्पत्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांनी बोरडे व वाढई परिवाराच्या वेळेच्या नियोजनाचे विशेष कौतुक करत नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.

यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आमदार देवराव भोंगळे, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार सुभाष धोटे, बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, केशवराव ठाकरे सर, जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सय्यद आबिद अली तसेच आदर्श ग्राम कळमना येथील सरपंच नंदकिशोर वाढई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विवाह सोहळ्यादरम्यान बोरडे व वाढई परिवाराच्या वतीने शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आमदार देवराव भोंगळे, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार सुदर्शन निमकर व माजी आमदार सुभाष धोटे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी विविध विभागातील अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.

या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे अचूक आणि शिस्तबद्ध नियोजन. वराचे भाऊजी तथा सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी यांनी विवाह वेळेत पार पडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनामुळे सर्व धार्मिक विधी नियोजित वेळेनुसार पार पडले. उपस्थितांनीही या वेळपालनाचे आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचे मनापासून कौतुक केले.

हजारो आप्तस्वकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा विवाह सोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता “वेळेचे व्यवस्थापन आणि संस्कारांचा आदर्श” म्हणून परिसरात चर्चेचा विषय ठरला. कार्यक्रमाचे प्रभावी व नेटके संचालन राष्ट्रसंतांच्या ओव्यांचा संदर्भ देत अविनाश पिंपळकर (वरोरा) यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here