By:Shankar Tadas
कोरपना :
तालुक्यातील तळोधी येथील एका गरीब कुटुंबाने मेताशा इंडियन गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात गंभीर तक्रार करत थेट इंडियन ऑइलच्या एरिया सेल्स अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. ग्राहकांच्या नावाने सिलेंडर “डिलिव्हर” दाखवून प्रत्यक्षात सिलेंडर न देण्याचा प्रकार उघड झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
तळोधी येथील मनोहर दोरखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या नावावरील गॅस कनेक्शन क्रमांक 7093356263 वर 7 मे रोजी सिलेंडर बुक करण्यात आले होते. मात्र एजन्सीकडून “सिलेंडर उपलब्ध नाही” असे सांगत त्यांना रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आले. त्यानंतर गावातील एका जाणकार व्यक्तीने मोबाईल तपासला असता 8 मे रोजीच सिलेंडर “डिलिव्हर” झाल्याचा संदेश आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे 23 मार्च 2026 रोजीचे सिलेंडर देखील मोबाईलवर वितरित दाखवत असताना प्रत्यक्षात तेही ग्राहकाला मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोरखंडे दाम्पत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “22 फेब्रुवारी 2026 नंतर आम्हाला एकही सिलेंडर मिळालेला नाही. दोन महिन्यांपासून आम्ही काड्यावर स्वयंपाक करत आहोत. आम्ही अशिक्षित असल्याने मोबाईलवरील मेसेज समजत नाहीत. एजन्सी कार्यालयातील लोकच आमच्या मोबाईलवरून बुकिंग करतात. आमच्या नावाने सिलेंडर उचलून फसवणूक केली जात आहे.”
यासोबतच गोडाऊनमधील कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. “तुला देणार कुठून, ज्यांना काय करायचे ते करून घ्या,” अशा शब्दांत बोलले जात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
गरीब व अशिक्षित ग्राहकांच्या नावावर सिलेंडर उचलून काळाबाजार किंवा अन्य गैरप्रकार होत आहेत काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे काही निवडक ग्राहकांना घरपोच सिलेंडर पुरवठा केला जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच प्रलंबित सिलेंडर तात्काळ घरपोच द्यावेत, अशी मागणी मनोहर दोरखंडे यांनी इंडियन ऑइलचे एरिया सेल्स ऑफिसर आकाश आमले यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची प्रत कोरपना तहसीलदार व चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
28 मार्च रोजी माझ्या नावाचे सिलेंडर डिलिव्हर दाखवत आहेत सिलेंडर मिळाले नाही सिलेंडरच्या मागणीकरिता एजन्सी मध्ये मागील पंधरा दिवसापासून चकरा मारत आहो कडून सांगण्यात आले 14 मे रोजी बुकिंग झाल्यानंतर सिलेंडर मिळतील विक्री अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतरही काही कार्य होत नाही.
****
उंदरु बांदुरकर
गॅस ग्राहक, सोनुर्ली(गाडेगाव)
गॅस कनेक्शन असं नाही मागच्या दोन महिन्यापासून सिलेंडर नसल्याने लाकडे पेटवून स्वयंपाक करीत आहे अशिक्षित असल्याने आमची चांगलीच फसवणूक झाली आहे 23 मार्च व 8 मे रोजीचे सिलेंडर मिळाले नाही आता तक्रार केल्यावर सिलेंडर आणून देतो असा फोन एजन्सी कडून आला.
शकुंतला मनोहर दोरखंडे, तळोधी




