Home
Home Breaking News **विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी विकसित करावा वैज्ञानिक दृष्टिकोन – सचिव वीरसिंह...

**विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी विकसित करावा वैज्ञानिक दृष्टिकोन – सचिव वीरसिंह रणसिंग**

लोकदर्शन इंदापूर 👉गणेश धनवडे

कळंब (ता. इंदापूर) येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात विज्ञान विभाग व ‘बेस्ट प्रॅक्टिस’ समितीच्या संयुक्त विद्यमाने सायन्स फेस्ट (Science Fest) चे आयोजन करण्यात आले. या विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन समारंभ प्रसंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदापूरचे डॉ. राजेंद्र साळुंखे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामतीचे डॉ. विजय मोहिते व डॉ. विकास काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, विज्ञान विभागप्रमुख डॉ. सुहास भैरट, समन्वयक प्रा. राजलक्ष्मी रणसिंग तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना सचिव वीरसिंह रणसिंग म्हणाले की, “विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड व प्रश्न विचारण्याची सवय विकसित होणे अत्यावश्यक आहे.” विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, संशोधनाकडे वळण्याची गरज आणि महाविद्यालय स्थापन करण्यामागील उद्देश यांचे त्यांनी सविस्तर विवेचन केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, नव्या संशोधन कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सैद्धांतिक ज्ञानास प्रत्यक्ष प्रयोगांची जोड देणे, तसेच विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, आत्मविश्वास व सादरीकरण कौशल्य वाढविणे या हेतूने महाविद्यालयात गेली दोन वर्षे सायन्स फेस्टचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सायन्स फेस्ट अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान व पर्यावरणशास्त्र या विषयांवरील विविध मॉडेल्स व प्रकल्प सादर केले. नवीकरणीय ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आदी विषयांवरील प्रकल्प विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोग सादर करून गुंतागुंतीच्या वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत उपस्थितांना समजावून सांगितल्या.

पोस्टर प्रदर्शनामध्ये विविध वैज्ञानिक विषयांवरील माहितीपूर्ण पोस्टर्स विद्यार्थ्यांनी तयार करून मांडले. सायन्स फेस्टमधील प्रकल्पांचे मूल्यमापन डॉ. राजेंद्र साळुंखे, डॉ. विजय मोहिते व डॉ. विकास काकडे या तज्ज्ञ परीक्षक समितीमार्फत करण्यात आले. प्रकल्पातील नाविन्य, उपयोगिता, सादरीकरण कौशल्य व वैज्ञानिक स्पष्टता या निकषांवर प्रकल्पांचे परीक्षण करण्यात आले.

समारोप प्रसंगी उत्कृष्ट प्रकल्प व पोस्टर सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह, वैज्ञानिक जिज्ञासा आणि सहभाग पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमामध्ये एकूण १०३ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले वैज्ञानिक विचार आणि कल्पकता प्रभावीपणे मांडली. या सायन्स फेस्टमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी अधिक रुची व अभ्यासाची ओढ निर्माण झाल्याचे दिसून आले.

सायन्स फेस्टसाठी तालुक्यातील नंदिकेश्‍वर विद्यालय जंक्शन, कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली, श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर, NES हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर, L.G. बनसुडे विद्यालय पळसदेव, केतकेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज निमगाव केतकी आणि विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब (वालचंदनगर) आदी शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

समारोप समारंभात अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी सर्व मान्यवर, सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानत त्यांचे कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानाच्या जगाशी जोडणारे समृद्ध व्यासपीठ मिळत असल्याचे नमूद केले. 🌱🔬📚

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here