Home
Home Breaking News गडचांदूरमध्ये दुचाकींच्या धूमस्टाईल वेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढले ♦️जनतेकडून पोलीस प्रशासनाकडे कडक...

गडचांदूरमध्ये दुचाकींच्या धूमस्टाईल वेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढले ♦️जनतेकडून पोलीस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी

लोकदर्शन गडचांदूर 👉रवि. गेलडा

गडचांदूर — शहरात सध्या दुचाकीस्वारांकडून भरधाव वेगाने व धूमस्टाईलने गाड्या चालवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेत दोन-तीन अल्पवयीन मुले एकाच दुचाकीवर बसून बेदरकारपणे गाड्या चालवत असल्याचे चित्र रोज दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही दुचाकीस्वार अतिवेगाने रेस लावत, जोरजोरात आवाज करणारे सायलेन्सर वापरत शहरातील मुख्य रस्त्यांवरून गाड्या चालवतात. या प्रकारामुळे पादचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा अचानक कट मारणे, रस्त्यावर अडथळा निर्माण करणे आणि नियमांचे सर्रास उल्लंघन करणे यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघात घडत आहेत.

याबाबत पोलीस प्रशासनाकडून ठोस नियंत्रण किंवा सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. “जर पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून दुचाकी चालवणाऱ्यांचे परवाने तपासले, अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई केली आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली, तर मोठ्या अपघातांची शक्यता निश्चितच कमी होईल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांनी पुढे असेही सांगितले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन असेच सुरू राहिल्यास जनतेमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने आणि कठोर पावले उचलावीत, अशी तीव्र मागणी जनतेकडून होत आहे.

एकूणच, गडचांदूर शहरात वाढत चाललेल्या धूमस्टाईल दुचाकी चालवण्यावर वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक असून, जनतेच्या आणि वाहनचालकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी तात्काळ कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here