लोकदर्शन गडचांदूर 👉 रवि गेलडा
गडचांदूर — सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आदरपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचा शुभारंभ संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
प्राचार्य ताकसांडे यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता, शिक्षण, समाजसेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे व व्यवसाय विभागाचे प्रमुख व्ही. जी. मुप्पीडवार यांनीही गाडगे महाराजांच्या जीवनातून समाजोपयोगी कार्याची प्रेरणा घेण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली. सहा. शिक्षिका भुवनेश्वरी गोपमवार यांनी विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच समाजहितासाठी सक्रिय योगदान देण्याचे संदेश दिले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रा. जहीर एस. सैय्यद यांनी केले, तर कार्यक्रमाचे समारोप प्रा. नितीन टेकाडे यांनी आभार प्रदर्शन करून केले. या पुण्यतिथीच्या आभार व्यवस्थापनात प्रा. ए. डी. सातारकर, प्रा. एस. पी. कोल्हे, लिलाधर मत्ते आणि सीताराम पिंपळशेंडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
सर्वांनी एकत्र येऊन घेतलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थी प्रेरित झाले असून, संत गाडगे महाराजांच्या शिक्षण आणि स्वच्छता अभियानातून समाजसेवेचे महत्त्व अधिक दृढ झाले, असा निष्कर्ष कार्यक्रमातून निघाला.





