By : Shankar Tadas
गडचांदूर (कोरपना) :
गडचांदूर नगर परिषदेची निवडणूक अगदीच अभूतपूर्व ठरली. साम दाम दंड भेद आणि बरेच काही फंडे वापरून निवडणूक जिंकण्याची जीवघेणी शर्यत सर्वत्र दिसून आली. राज्यातील सत्ताधारी भाजपाच नव्हे तर राष्ट्रवादी, शिवसेना यांनीही आपले अस्तित्व राखण्यासाठी जोरदार तयारी केली होती. प्रभाग 9 मध्ये मतदान यंत्र फोडण्याच्या घटनेने गडचांदूर निवडणुकीची बातमी झपाट्याने पसरली. उशिरापर्यत मतदान केंद्रा वर न आल्याने बऱ्याच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. सर्वच पक्षानी एकमेकांवर पैसे वाटल्याचा आरोप केला. वेळेच्या आत केंद्राच्या आत पोहोचलेल्या मतदारांचे रात्री उशिरापर्यंत मतदान पार पडले. कोणत्याही एका पक्षाला पाचही नगरसेवक जिंकता येण्याची शक्यता कमीच आहे. नगराध्यक्षपदाची तिरंगी लढत असून अपक्ष निलेश ताजने यांनी सर्वाधिक जोर लावल्याचे बोलले जाते. मात्र, भाजपा व काँग्रेसची मते मागच्या दाराने त्यांच्यापर्यंत किती पोहोचतात यावरच त्यांची भिस्त आहे. काँग्रेसची मते विभाजित झाली. त्यामुळे तिरंगी लढतीत भाजपाचे डोहे आणि अपक्ष ताजने यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निवडणूक निकाल 21 डिसेंबरला लागेल. तोवर शक्यतेच्या चर्चा चांगल्याच रंगतील, एवढे मात्र निश्चित.
🔴🔴🔴🔴
गडचांदूर प्रभाग ९ : ईव्हीएमचा गोंधळ वाढला; मतदाराकडून मशीन फोडल्याने केंद्रावर तणाव
🔴🔴🔴🔴🔴
निवडणुकीदरम्यान प्रभाग ९ मधील आदर्श हिंदी विद्यालय (केंद्र क्रमांक २) येथे आज मोठा गोंधळ उडाला. राम मल्लेश दुर्गे (वय ४०) या मतदाराने मतदान प्रक्रियेदरम्यान ‘नगारा’ बटन दाबल्यानंतर अचानक भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाचा दिवा लागल्याचा आरोप करत संतापाच्या भरात ईव्हीएम मशीन फोडून टाकली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांना शांत करण्यासाठी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी ईव्हीएमची पंचनामा प्रक्रिया सुरू केली असून पुढील चौकशी सुरू आहे.





