आता गावातच मिळेल बी.ए. पदवीचे शिक्षण : गोंडवाना विद्यापीठाचा उपक्रम

By : Rajendra Mardane 

वरोरा :  गरिबी आणि संधीचा अभाव यामुळे पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या ग्रामीण लोकांसाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली उन्नत भारत अभियान अंतर्गत आदर्श पदवी महाविद्यालय, गडचिरोली तथा ग्राम पंचायत,खेमजई व आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा द्वारा आयोजित ‘ विद्यापीठ आपल्या गावात ‘ या उपक्रमाचे उद्घाटन वरोरा तालुक्यातील खेमजई येथे गोंडवाना विद्यापीठाचे मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. आमुदाला चंद्रमौली यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आनंदनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रंजना लाड, सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रवीण मुधोळकर, आदर्श पदवी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे समन्वयक भरत घेर, सामाजिक कार्यकर्ता गुरुदास आडे, डॉ. प्रमोद गंपावार, खेमजेई ग्रामपंचायत सरपंच मनीषा चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. आमुदाला चंद्रमौली म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत सुरू केलेल्या विद्यापीठ आपल्या गावात या अभिनव उपक्रमात पुस्तकी शिक्षणाचा अतिरेक टाळून यामध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात आलेला आहे. संवाद कौशल्य, उद्योगाच्या संधी यावर हा अभ्यासक्रम आधारित असल्यामुळे ग्रामीण लोकांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आपल्या मनोगतात डॉ. रंजना लाड यांनी खेमजई गावाचे आनंद निकेतन महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध आणि दोन शिबिरांमध्ये मिळालेले सहकार्य याचा विशेषत्वाने उल्लेख केला. प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी ग्रामीण भागातील पदवी शिक्षणाच्या कमतरतेवर चिंता व्यक्त केली. विद्यापीठाच्या या अनोख्या उपक्रमामुळे ही उणीव भरून निघेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. संध्याकाळी सहा चे नऊ या वेळेत हे वर्ग घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. डॉ. प्रवीण मुधोळकर यांच्याद्वारे ग्रामीण विकास या विषयावर माहिती देऊन या अभ्यासक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
प्रास्ताविक भारत घेर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन रमेश चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन बी.ए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सुधीर नन्नावरे यांनी केले.
याप्रसंगी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here