वरोरा येथे जीटीएस बेंच मार्कचा महत्वपूर्ण शोध

By : राजेंद्र मर्दाने

चंद्रपूर : संपूर्ण भारतीय उपखंडात शास्त्रीय दृष्टिकोनातून अचूकतेने सर्वेक्षण करण्यासाठी ब्रिटिश पायदळ अधिकारी, सर्वेक्षक आणि भूगोलशास्त्रज्ञ लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी ज्या त्रिकोणमितीय सर्वेक्षणाच्या आधारे समुद्रसपाटीपासून अनेक स्थळांच्या उंचीचे मोजमाप करून जे बेंचमार्क स्थापित केले होते त्यातील एक जीटीएस ( ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्व्हे ) बेंचमार्क वरोरा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील पेयजल टाकीजवळ शोधण्यात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कडू आणि राजेंद्र मर्दाने यांना यश मिळाले आहे. १० एप्रिल हा दिवस ‘ भूमापन दिन ‘ म्हणून साजरा केल्या जातो आणि त्याच्या पूर्वसंध्येवर मिळालेल्या या यशाने भूक्षेत्राशी निगडित कार्य करणाऱ्या व्यक्ती, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, संपूर्ण देशात समुद्र सपाटीपासून कोणत्याही स्थळाची उंची मोजण्यासाठी सन १८०२ मध्ये ले. कर्नल विल्यम लॅम्बटन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीद्वारे त्रिकोणमितीय सर्वेक्षण सुरू करून बेंचमार्क स्थापित करण्यात आले होते पण जनमानसात याबद्दल जनजागृती झाली नसल्याने किंबहुना याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे काळाच्या ओघात हा विषयच मागे पडला. जीटीएस या ऐतिहासिक ठेव्याबद्दल माहिती एकत्रित करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्यांची एक चमू कार्य करीत आहेत. उपलब्ध माहितीच्या आधारे अधिक शोध करताना टीमच्या सदस्यांनी वरोरा रेल्वे स्थानकावर जीटीएस बेंचमार्क शोधून काढण्यात यश मिळवले आहे.
लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी १० एप्रिल १८०२ साली मद्रास (चेन्नई) येथील मरीना बीचपासून त्रिकोणमितीय सर्वेक्षणाला सुरुवात केली.त्यांना महान त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचे संस्थापक म्हंटल्या जाते. सन १८६० पर्यंत सर्वेक्षणाचे कार्य सुरू होते. महान भारतीय त्रिकोणमितीय सर्वेक्षण हे जगातील सर्वात मोठे भूमापन सर्वेक्षण होते. या त्रिकोणमितीय सर्वेक्षणातून संपूर्ण देशात समुद्र सपाटीपासून उंचीचा संदर्भ म्हणून बेंचमार्क स्थापित करण्यात आले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना प्रवासात आपल्याला रोडच्या बाजूला गावाचे अंतर दर्शविणारे माईल स्टोन निदर्शनास येतात. ते दोन गावातील अंतर दर्शवितात तर जीटीएस बेंचमार्क हे समुद्रसपाटीपासून त्या ठिकाणची उंची दर्शविते. बेंचमार्क म्हणजे समुद्रापासून त्या ठिकाणची उंची. पृथ्वी ही निव्वळ सपाट नसून उंच डोंगर, दऱ्या, पर्वतांनी ती वेढलेली असून तिच्या प्रत्येक ठिकाणची उंची ही वेगवेगळी आहे , याउलट समुद्रातील पाण्याचा स्तर स्थिर असतो म्हणून उंची मोजण्याकरिता समुद्रसपाटीचा वापर केला जातो. हिमालयातील एवरेस्ट शिखराची उंची सुध्दा याच त्रिकोणमितिय सर्वेक्षणाच्या माध्यमातून समुद्रसपाटीपासून मोजल्या गेली. समुद्रसपाटीचा संदर्भ देण्याकरिताच जीटीएस म्हणजे महान त्रिकोणमितिय सर्वेक्षणांतर्गत भारतात जीटीएस स्टँडर्ड बेंचमार्क व जीटीएस बेंचमार्क स्थापित केल्या गेले.
विदर्भात तीन जीटीएस स्टँडर्ड बेंचमार्क आणि अनेक बेंचमार्क स्थापित करण्यात आले आहेत. बहुतांश रेल्वे स्टेशनवर १९०७ साली बेंचमार्क स्थापित करण्यात आले. परंतु रेल्वे तसेच संलग्न विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनाच या बेंचमार्क बद्द्ल माहिती नसल्यामुळे तसेच सर्वसामान्य नागरिक याबाबत अनभिज्ञ असल्याने याबाबतचा उहापोह होताना दिसत नाही. रेल्वे स्टेशनवरील हे बेंच मार्क स्टोन दुर्लक्षित राहिले आणि काळाचा ओघात विस्मरणात गेले. विदर्भातील तीन जीटीएस स्टँडर्ड बेंचमार्कची अवस्था सुध्दा तशीच आहे. सर्वात जवळचे स्टँडर्ड बेंचमार्क हे हिंगणघाट येथे लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्बटन यांच्या स्मारकासमोर १९०७ साली स्थापित करण्यात आला. नागपूर येथे झीरो मैल स्टोन च्या बाजुला सुध्दा स्टँडर्ड बेंचमार्क स्थापित करण्यात आले. समुद्रसपाटीपासून ज्ञात उंचीचा संदर्भ म्हणून हा बेंचमार्क स्थापित करण्यात आला. जमिनीचे विभाजन, बांधकाम, अचूक मोजमाप, नकाशे तयार करण्याकरिता, पूर नियंत्रण रेषा, पर्यावरण बदल, भूप्रदेशातील बदल, मातीची धूप,आपत्ती व्यवस्थापन इ. मोजमापामध्ये सुनिश्चित व सातत्य राखण्याकरिता हे बेंचमार्क महत्त्वाचे ठरले आहे.
भारतात स्थापित बेंचमार्क त्रिकोणमितीय सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. देहरादून येथून १९१० रोजी गवर्नमेंट ऑफ इंडिया द्वारा प्रकाशित ‘ द ट्रिगोनोमेट्रिकल सर्वे ऑफ इंडिया ‘ Volum XIXI च्या ” डिक्रिप्शन अन्ड हाईटस् ऑफ बेंचमार्क ऑन साऊर्थन लाईन ऑफ लेवलिंग ” मध्ये याबद्दलची माहिती आहे. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्टेशन मधील स्टेशन मास्तर कार्यालयाजवळ लोखंडी प्लेट मध्ये स्थापित तीन बेंचमार्क असल्याचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. त्यानुसार शोध घेतला असता सामाजिक कार्यकर्ता प्रवीण कडू व पत्रकार राजेंद्र मर्दाने यांनी, जिज्ञासू वृत्तीने, अत्यंत मेहनतीने ११७ वर्ष जुना एक जीटीएस बेंचमार्क शोधून काढला. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर थंड पेयजल टाकीजवळ जमिनीपासून जवळपास ६- ७ इंच उंचीवर दीड फूट उंच लोखंडी खांबावर लोखंडी प्लेट लावलेला बेंचमार्क आढळला. या कार्यात त्यांना रेल्वेचे वरिष्ठ अनुभाग अभियंता (कार्य) सलीलकुमार आणि याच विभागाचे कर्मचारी रामदास वांढरे यांनी सहकार्य केले. दुसरा बेंचमार्क नवीन बांधकामादरम्यान नष्ट झाल्याची अथवा जमिनीत गाढला गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या शिवाय जिल्ह्यातील माजरी येथे सुध्दा बेंचमार्क असल्याचे कळते त्याचा शोध सुरू आहे.

 

*जीटीएस बेंचमार्कचे जतन आवश्यक*
जीटीएस बेंचमार्क संबंधित असलेले स्टोन, आयर्न प्लेट हे महान त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचे महत्वाचे दस्तावेज आहे. त्याचा शोध घेऊन त्यांचे जतन व्हायला पाहिजे. विशेष म्हणजे महान त्रिकोणमितीय सर्वेक्षण भारतात झाल्यामुळे या प्रकारचे बेंचमार्क भारतातच स्थापित करण्यात आले आहेत. हिंगणघाट येथे ले. कर्नल विल्यम लॅम्बटन यांच्या स्मारकासमोर १९०७ साली स्टँडर्ड बेंचमार्क स्थापित करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील सोनेगांव रेल्वे स्थानकावर सुद्धा जीटीएस बेंचमार्क आढळला आहे. जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर हे बेंचमार्क असून काळाच्या ओघात नष्ट झाले. रेल्वे विभाग, भूमापन विभाग अन्य संबंधित विभाग यांना सुद्धा याबाबत कल्पना नसल्याची माहिती समोर येत असल्याने या बेंचमार्कचा शोध घेणे, ते जतन करून जिज्ञासूंना कळण्यासाठी त्याची माहिती व उपयोगितेचा फलक लावणे आवश्यक आहे.
*प्रवीण कडू*
सचिव
लेफ्टनंट कर्नल विल्यम लम्बटन स्मृती समारोह समिती व निसर्गसाथी फाउंडेशन, हिंगणघाट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *