वरोरा तालुकावासी ट्रेनच्या थाब्यांपासून वंचित, भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघातर्फे आंदोलनाचा इशारा

by : Rajendra Mardane

वरोरा : कोरोना संक्रमणाच्या लॉक डाऊन काळात बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, वरोरा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा तसेच मुंबई, पुण्यासाठी दररोज २२/२४ डब्ब्याची सुपर एक्सप्रेस चालविण्यात यावी, अशी येथील नागरिकांची प्रलंबित मागणी असून रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या मागणीकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत. वरोरा – भद्रावती- चंद्रपूर स्थानकावर प्रवाश्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी दिला आहे . याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. शिवनंद लंगडापुरे यांना निवेदन देण्यात आले.
मागील काही महिन्यांपूर्वी वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने वरोरा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या अनुक्रमे १२७९१ / ९२ सिकंदराबाद पटना एक्सप्रेस,१२६१५ / २६ जी.टी. एक्सप्रेस२२६४५ / ४६ अहिल्यानगरी एक्सप्रेस १२९७५ /७६ जयपूर एक्सप्रेस, १२५११ /१२ गोरखपूर एक्सप्रेस, १२९९५ / ९६ संघमित्रा एक्सप्रेस, ११०४० / ४१ धनबाद कोल्हापूर एक्सप्रेस , १२७६७ / ६८ संतरागाछी एक्सप्रेस चा थांबा देण्यात यावा, अशी न्याय्य मागणी आहे. कोरोना संक्रमणाच्या लॉक डाऊन काळात बंद केलेल्या गाड्या ( नंदीग्राम एक्सप्रेस, जयंती जनता एक्सप्रेस, आनंदवन एक्सप्रेस, पॅसेंजर, बल्लारशाह – मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस) पुन्हा सुरू करण्यात याव्यात. मुंबई पुण्यासाठी प्रतिदिन २२ / २४ डब्यांची सुपर एक्सप्रेस चालविण्यात यावी. बल्लारशाह ते हावडा नवीन गाडी चालविण्यात यावी. सर्व पॅसेंजर ट्रेन पूर्ववत पुन्हा सुरू करण्यात याव्यात. वरोरा रेल्वे स्थानकावर स्वयंचलित पायऱ्या व लिफ्ट ची व्यवस्था करण्यात यावी. अशा आशयाचे सविस्तर स्वयंस्पष्ट निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे नावे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार, मध्य रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक नरेश लालवाणी, नागपूर मध्य रेल्वेचे प्रबंधक, वाणिज्य (प्रबंधक), चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, वरोरा उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे आदींना देण्यात आले होते. या मागण्यांचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वेमंत्री मंत्री यांना पाठवून त्याच्या पूर्ततेसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले होते. सोबतच वेळोवेळी याबाबत जनप्रतिनिधींना विचारणाही करण्यात आली. परंतु अपवाद वगळता लोकप्रतिनिधी यांनी याबाबत पाठपुरावा केला नसल्याचे दिसून येते. परिणामतः बराच कालावधी लोटूनही प्रवाशांच्या रास्त मागण्यांच्या संदर्भात एक साधे उत्तर वरिष्ठ स्तरावरून अजूनपर्यंत प्रवाशी संघाला देण्यात आले नाही, हा नाकर्तेपणाचा कळस आहे . रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच जनता रेल्वे गाड्यांच्या थाब्यांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहिला नसल्याचे राजेंद्र मर्दाने यांनी सांगितले.
प्रवाश्यांच्या मागण्या रास्त आहे. वरोरा रेल्वे स्थानकावर गाड्या थांबणे गरजेचे आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. अन्यथा रेल्वे संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी ३० नोव्हेंबर पासून आंदोलन करण्याचा इशाराही मर्दाने यांनी दिला आहे.
शिष्टमंडळात माजी प्राचार्य बळवंतराव शेलवटकर, बंडू देऊळकर, प्रवीण सुराणा, जगदीश तोटावार, खेमचंद नेरकर, मयुर दसुडे आदींचा समावेश होता.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *