रेल्वेच्या मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलने वाढणार गडचांदूर शहराची शान

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील गडचांदूर रेल्वे स्थानकावर गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल विकसित करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला आहे. १५.२० कोटी रुपये खर्चून सदर टर्मिनल बांधण्यात येणार असून यामुळे गडचांदूर शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. सदर बांधकामाचे टेंडर स्थानिक दालमिया भारत कंपनीला मिळाल्याने लवकरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाने तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर स्थानकावर नवीन गती शक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्गो टर्मिनल पूर्णपणे रेल्वेच्या जमिनीवर बांधले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास खाजगी जमिनीचे सुद्धा अधिग्रहण करण्यात येणार आहे. बांधकामाकरिता दालमिया सिमेंट भारत लिमिटेडला १५.२० कोटी रुपयांची निविदा देण्यात आली आहे.
उद्योगांकडून गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने गती शक्ती कार्गो टर्मिनल धोरण सुरू केले आहे. हे टर्मिनल्स रेल्वेद्वारे वाहतुक करण्याची आवश्यकता असलेल्या वस्तूंची रेल्वेद्वारे आयात-निर्यात सुलभ करतील. त्यामुळे सुरक्षित वाहतूक होण्यास मदत होईल.
जीसीटीच्या बांधकामामध्ये अतिरिक्त रेल्वे लाईन टाकणे, पृष्ठभागाचे काँक्रिटीकरण, इलेक्ट्रॉनिक वे ब्रिज, हमाली विश्रामगृहाची तरतूद, आच्छादित शेड, अप्रोच रोड, पाणी पुरवठ्याची तरतूद, संगणकीकृत पद्धतीची स्थापना, माहिती प्रणाली, ट्रॅक मॅनेजमेंट सिस्टम, अतिरिक्त लाईनचे विद्युतीकरण, हायमास्ट लाइटिंग अशा अनेक बाबींवर काम होणार आहे.
दालमिया भारत सिमेंटसोबत करण्यात आलेल्या कराराचा कालावधी ३५ वर्षांचा आहे. सोबतच देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सुद्धा दालमिया भारत सिमेंटचीच आहे. ट्रॅक, सिग्नल आणि टेलिकॉम सारख्या मालमत्तेची देखभाल आणि कर्मचारी खर्च रेल्वेकडून केला जाणार आहे. रेल्वेने वाहतूक हा सर्वात सुरक्षित, सोपा आणि सर्वात स्वस्त पर्याय असल्याने चंद्रपूर परिसरात असलेल्या सिमेंट कंपन्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

मालवाहतूक होणार मग प्रवासी वाहतुकीचे काय? – आशिष देरकर
रेल्वेने घेतलेला निर्णय गडचांदूर शहरवासीयांसाठी जरी स्वागतार्ह असला तरी कित्येक वर्षापासून सुरू असलेली रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक सुरू कधी होतील? हा प्रश्न अजूनही कायम आहे. तसेच दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचांदूर-आदीलाबाद प्रवासी रेल्वेलाईनसाठी निधी प्रस्तावित करून बल्लारशाह ते आदीलाबाद रेल्वे लाईनची अनेक वर्षापासून असलेली मागणी प्रलंबित असल्याने ती पण लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी सिकंदराबाद रेल्वे विभागाच्या सल्लागार समितीचे माजी सदस्य प्रा. आशिष देरकर यांनी केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *