लोकप्रतिनिधीनी आपल्या समाजापुरता विचार त्यागावा !

 

By : Milind Gaddamwar

कुठलाही लोकप्रतिनिधि किंवा आमदार,खासदार हे एका विशीष्ट समाजाचे नसतात.खासदार संभाजीराजे हे मराठ्यांची बाजू घेऊन आरक्षण मिळवून देण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत.अभिनंदनीय अशी ही बाब ठरते आहे.मराठा समाजाचे मागासलेपण सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होवू शकलेले नाही.हे सर्वच भारतीय जाणून आहेत.असेच गुर्जर,पटेल (पाटिदार), जाट,धनगर,वाणी, मुस्लिम इ.समाजातील लोकांनी पण आरक्षणाची मागणी लावून धरलेली आहे.घटनेतील तरतुदीनुसार ५०% च्या आरक्षणाला कुणीही हात लावू शकत नाही.कारण ते मागासलेपणावर आधारलेले आहे.उर्वरीत ५०% वर सर्वांची भिस्त अवलंबून आहे.यातील जास्तीत जास्त वाटा आपल्या समाजाला मिळावा या अपेक्षेने सर्वचजण झपाटलेले आहेत‌.हळुहळु EWS कडे आता सर्वांचेच डोळे वळत आहेत.मराठा समाजाचा EWS मध्ये समावेश करतांना मराठा समाजातील ३०% सधन वर्गातील लोकांना यातून वगळण्यात यावे अशी मागणी खा.संभाजीराजे यांनी केलेली आहे.हीच बाब सर्वच स्तरातील लोकांना लागू करण्यात यावी अशी मागणी खा.संभाजीराजे कां करीत नाहीत ? छत्रपती शिवाजी महाराजांनी असा भेदभाव कधीच केला नसता. ते सर्व जनतेचे,ख-या अर्थाने रयतेचे राजे होते.आज जो हा आपमतलबीपणा अंगी रूजला गेलेला आहे यात मतांचे राजकारण लपल्या गेलेले आहे.छ.शिवाजी महाराज हे स्वयंभू राजे होते.आज आपण लोकशाही व्यवस्थेचा भाग आहोत हा विसर पडता कामा नये.आपण लोकप्रतिनिधी असल्याने आपल्याला काही मर्यादा पडतात.मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आता सर्वव्यापी झालेला आहे.मराठ्यांच्या आरक्षणाचा विचार करतांना इतर समाजातील लोकांचा पण विचार करणे अनिवार्य झालेले आहे.खा.संभाजीराजेंनी हे समजून घेतले पाहिजे. आरक्षणाची मागणी करणा-यांनी सर्वांची एकत्र मोट बांधून केंद्र सरकारशी दोन हात केले गेले पाहिजेत.याचे नेतृत्व खासदार संभाजीराजेंनी करावे असे फार तर म्हणता येईल.आरक्षणाची ही आरपारची लढाई आता फक्त मराठा आरक्षणापुरतीच मर्यादीत न रहाता ती सर्वव्यापक व्हावी.यासाठी घटनेतील तरतुदींमध्ये काही सुधारणा कराव्या लागत असतील तर घटना तज्ञांचा रीतसर सल्ला घेऊन त्या सुधारणा करण्यात याव्यात. आता हाती आलेली ही सुवर्ण संधी वाया घालवता कामा नये.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही ईष्टापत्ती समजून सर्वांना सोबत घेऊन आरक्षणावरचा तोडगा काढून तो मार्गी लावण्यात यावा.तरच हे भिजत राहिलेले आरक्षणाचे गौडबंगाल मार्गी लावण्यात यश संपादन करता येईल असे वाटते आहे.कारण आज आरक्षणाचा मुद्दा हा फक्त मराठा समाजापुरता मर्यादीत राहीलेला नाही. हे आधी समजून घेऊन काम करावे लागेल.
****
मिलिंद गड्डमवार, राजुरा

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *