तिच्या गृहकार्याचे ‘मूल्य’ आजही झिरोच !!


By : Narendra Gaikwad, Nagpur
महिलांना कमी लेखण्याची कोणतीही संधी पुरुषप्रधान संस्कृतीने कधीच सोडली नाही. तिला फक्त भोग्य वस्तू समजून वागविले गेले. स्त्रीने कितीही प्रगती केली तरी समाजात खोल रुजलेली ही हीन मानसिकता अद्याप बदललेली नाही. तिच्या अव्याहत गृहकार्याचे आर्थिक महत्व जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आले आहे. ही जाणीव प्रभावीपणे आपल्या चित्रातून प्रगट केलीय एका नववीचा मुलाने.

आपल्याआधी तिचा दिवस सुरू होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत:ला मात्र पूर्णपणे विसरणारी ती. तसं पाहिलं तर गृहिणीच्या कामाचं आणि तिच्या त्यागाचा कोणताही मोबदला, साधसं कौतुक तर सोडाच पण आपल्याकडे घरातला प्रत्येकजण तिला गृहीत धरताना दिसतो.
खरंतर महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त वेळ काम करतात. जगातल्या अनेक महिला आजही याच प्रश्नाशी लढताहेत की, गृहिणी म्हणून करत असलेल्या कामाला पुरुषांच्या कामाइतकाच सन्मान का मिळत नाही ?
एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभर कसा अभ्यास केला हे त्यांच्या गुणपत्रिकेवरुन जसं कळतं तसेच देशाच्या आर्थिक घडामोडींवर नजर ठेवताना कोणत्या क्षेत्रात तेजी व कोणत्या क्षेत्रात घट झाली आहे हे जीडीपी ठरवतं त्याप्रमाणे घरातल्या कामांना जीडीपीमधील योगदान म्हणून पाहिलं जात नाही. तसंच, नोकरी किंवा व्यवसायाला समाजात जितकं महत्त्व दिलं जातं, तेवढं घरातल्या कामांना महत्त्व दिलं जात नाही. अशातच घर सांभाळणा-या स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून केला जाणारा प्रश्न, तू घरात काहीच करत नाही वा तू काय केलंस ? हा असतोच.

अशाच आपल्या आईचा, सर्वच स्तरातून गृहिणींचे योगदान इयत्ता नवव्या वर्गात शिकणाऱ्या केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील कुंडुवारा निवासी अजुनाथ सिंधू विनयलाल या मुलाने त्याच्या कृतीतून जगाला दाखवून दिले आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये हृदयाघाताने सोडून गेलेल्या आई सिंधूला अजुनाथ या तिच्या मुलाने काढलेल्या पेंटिंग खुप आवडायच्या. आजही नवव्या वर्गात शिकणारा आईविना पोरका असलेला, अजुनाथ जेव्हा जेव्हा आईची आठवण येईल तेव्हा तेव्हा ब्रश आणि कॅनव्हास घेऊन बसतो व तिच्या आठवणी चित्रीत करतो.
आई सकाळपासून तर रात्रीपर्यंत घरातील कामात असायची. वडील तिला नेहमी टोमणे मारायचे, “तुम काम ही क्या करती हो ?” तरीपण सिंधूने ह्या टोमण्यांना तिच्या आयुष्याचा भाग समजून कधीच प्रत्युत्तर म्हणून आपल्या कामाची यादी नव-यासमोर मांडली नव्हती. परंतु तेच टोमणे मात्र अजुनाथच्या मनावर वज्रासारखे घाव देत होते. जेव्हा आई सोडून गेली तेव्हा हेच घाव दहा वर्ष वय असताना अजुनाथ त्याच्या आईच्या दैनंदिन कामाचे महत्त्व त्याच्या वडिलांनाच नव्हेतर, जगाला पेंटिंगमधून सांगायला लागला. त्याच्या त्या पेंटिंग इतक्या प्रभावशाली आहेत की, त्या बनल्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच २०२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या कव्हर पेजवर त्यांना जागा देण्यात आली.
‘माय मदर एंड द मदर इन माय नेबरहुड’ असे शीर्षक असणा-या अजुनाथच्या या पेंटिंग्ज मध्ये केवळ त्याची आईच नव्हेतर सर्वच महिलांना सकाळी उठल्यापासून तर उशिरा रात्रीपर्यंत वेगवेगळी कामे करतांना दाखविण्यात आले आहे. यात महिला जेवण बनविताना, कोंबड्यांना दाणे देताना, भाजी विकत घेणे, मसाल्याची वाळवण करताना, विहीरीवर पाणी भरताना, साफ-सफाई, भांडी धुणे, कपडे धुवून वाळू घालताना, मुलांचे वेणी- भांग करण्यापासून तर नव-याला डबा देण्यापर्यंत एकूण १७ पेक्षा अधिक कामे करतांना दाखविण्यात आले आहे. आज त्याच्या या बोलक्या पेंटिंग्जची जगातून स्तुती होते आहे.
नोकरी न करणारी आई काहीच काम करीत नाही असे टोमणे मारणा-या वडिलांना आईच्या रोजच्या कामाची चित्ररुप यादी त्याच्या शिक्षकांनी केरळ सरकारकडे पाठविले. ज्याला २०२० च्या ‘जेंडर बजेट’ च्या कव्हर पेजवर तर २०२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या कव्हर पेजवर जागा मिळाली. ही बातमी जेव्हा अजुनाथला समजली तेव्हा आईबरोबर आसपासच्या सर्वच गृहिणींच्या कामाचे महत्त्व, त्यांचा आवाज पोहोचलाय याचा आनंद झाल्यावाचून राहीला नाही. यावर “उसकी यह पेंटिंग अपनी मां की लाईफ के इर्दगिर्द है, उसने मुझे वो दिखाया, जिससे शायद मैं अनजान था, जिसे मैं देख नही पाया |” अशी त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया अंतर्मुख करणारी होती.
कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक असते. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच ‘जीडीपी’ होय.पण आजही घरातल्या महिलांच्या कामाकडे जीडीपीसारखे योगदान म्हणून पाहिले जात नाही. तिला याविरुद्ध लढा द्यावाच लागेल काय ?
गृहिणींच्या कामाचे आणि तिच्या त्यागाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधणा-या अजुनाथ सिंधू विनयलाल तुझे कौतुक व २०२१, केंद्रीय अर्थसंकल्पाच्या कव्हर पेजवर तुझ्या पेंटिंग्जला स्थान मिळाल्याबद्दल अभिनंदन…!!
**********
संकलन व शब्दांकन : नरेंद्र गायकवाड.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *