चालू वर्षातही कृषी क्षेत्राची वाढ राहणार कायम, खरिपासाठी खतांची मागणी वाढण्याची शक्यता

0
74

लोकदर्शन : मोहन भारती
दिनांक : 10-May-21
नवी दिल्ली : कोरोना साथीतही भारताच्या कृषी क्षेत्राचा लक्षणीय वृद्धीदर २०२१-२२ मध्ये कायम राहणार आहे. तथापि, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) वृद्धीला सावरण्यासाठी तो पुरेसा नसेल, असे विश्लेषकांनी म्हटले आहे.
भारतीय हवामान खात्याने १६ एप्रिल रोजी जारी केलेल्या अंदाजानुसार यंदा जून ते सप्टेंबर या काळात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. सरासरी ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मागील दोन दशकांच्या इतिहासात सलग तीन वर्षे मान्सून सामान्य राहाण्याची घटना फक्त दोन वेळा घडली आहे. ९४ ते १०६ टक्के मान्सून सामान्य गणला जातो.
२०२० मध्ये कोविड-१९ साथीमुळे कठोर लॉकडाऊन लावण्यात आले होते. तरीही, कृषीक्षेत्राने चांगली कामगिरी केली. जून २०२० च्या तिमाहीत इतर क्षेत्रे २४.४ टक्क्यांनी घसरलेली असताना कृषीक्षेत्र ३.४ टक्क्यांनी वाढले होते.
कृषी व्यवसाय संस्था कॉमट्रेडचे संचालक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, कृषीक्षेत्राची कामगिरी चांगली राहील, याचे संकेत सर्व घटकांद्वारे मिळत आहेत. कृषी मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, यंदा खरीप हंगामात खतांची मागणी १० टक्क्यांनी वाढून ३२ दशलक्ष टनांवरून ३५ दशलक्ष टनांवर जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here