Home
Home गडचांदूर / कोरपणा जिद्दीच्या जोरावर यशाची उंच भरारी; वेल्डिंग कामगाराच्या मुलाला बारावीत ९५.८० टक्के

जिद्दीच्या जोरावर यशाची उंच भरारी; वेल्डिंग कामगाराच्या मुलाला बारावीत ९५.८० टक्के

लोकदर्शन कोरपना 👉जयंत जेणेकर

कोरपना : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवण्याची क्षमता असते, याचे प्रेरणादायी उदाहरण वणसडी येथील ओम रोहिदास जाधव याने घालून दिले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना ओमने सीबीएसई बारावी परीक्षेत तब्बल ९५.८० टक्के गुण मिळवून संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

उपरवाही येथील अंबुजा विद्यानिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या ओमने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अथक मेहनतीच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले. साधी राहणी, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनसामग्री असतानाही त्याने हार न मानता अभ्यासात सातत्य ठेवले. त्यामुळेच आज त्याचे नाव यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत अग्रक्रमाने घेतले जात आहे.

ओमचे वडील रोहिदास जाधव हे वणसडी येथे वेल्डिंगची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रोजंदारीवर आधारित काम असल्याने उत्पन्न निश्चित नसते. त्याची आई मोलमजुरी करून संसाराला हातभार लावते. स्वतःचे पक्के घर नाही, शेती नाही, स्वतःचे दुकान नाही आणि कुठल्याही नातेवाईकांचा भक्कम आर्थिक आधार नाही. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, मोठे व्हावे आणि आयुष्यात स्वतःचे स्थान निर्माण करावे, या एकाच ध्येयाने जाधव दाम्पत्य झटत आहे.

कुटुंबातील संघर्षाची जाणीव ओमलाही होती. त्यामुळे त्याने परिस्थितीला दोष न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. दिवस-रात्र मेहनत घेत, वेळेचे काटेकोर नियोजन करत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अभ्यास केला. मोबाईल, मनोरंजन किंवा इतर गोष्टींपेक्षा शिक्षणालाच प्राधान्य देत त्याने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला.

ओमला दोन बहिणी असून त्यांनाही शिक्षणाची आवड आहे. मोठी बहीण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे, तर दुसरी बहीण विज्ञान शाखेचे पदवी शिक्षण पूर्ण करत आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही आपल्या तिन्ही मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्यासाठी आई-वडील अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्यांच्या त्यागाचे आणि संघर्षाचेच हे यश असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

ओमच्या या यशामुळे वणसडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्याचे अभिनंदन होत आहे. शिक्षक, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी ओमची यशोगाथा प्रेरणादायी ठरत असून, “परिस्थितीपेक्षा जिद्द मोठी असते” हे त्याने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here