Home
Home चंद्रपूर चंद्रपुरात रविवारी ‘ते पन्नास दिवस’वर साहित्यसंवाद; लेखक पवन भगत यांची प्रकट मुलाखत

चंद्रपुरात रविवारी ‘ते पन्नास दिवस’वर साहित्यसंवाद; लेखक पवन भगत यांची प्रकट मुलाखत

लोकदर्शन 👉अविनाश पोईनकर

ते पन्नास दिवस या गाजलेल्या कादंबरीवर चर्चा तसेच लेखक पवन भगत यांची प्रकट मुलाखत रविवारी, १७ मे रोजी चंद्रपुरात आयोजित करण्यात आली आहे. फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि स्तंभ पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता श्रमिक पत्रकार भवन, वरोरा नाका येथे होणार आहे.

कोरोना काळातील स्थलांतरित मजुरांच्या वेदना, उपासमार, असुरक्षितता आणि व्यवस्थेच्या संवेदनाहीन चेहऱ्यावर थेट भाष्य करणाऱ्या या कादंबरीवर पुणे येथील मैत्री प्रकाशनाच्या मोहिनी कारंडे भाष्य करणार आहेत. विशेष अतिथी म्हणून मनपा नगरसेवक नंदू नागरकर उपस्थित राहतील. तर संवादक म्हणून अविनाश पोईनकर हे लेखक पवन भगत यांची मुलाखत घेणार आहेत.

ते पन्नास दिवस या कादंबरीचा समावेश मुंबई विद्यापीठ तसेच अहमदनगरमधील स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही या कादंबरीचा समावेश झाला होता. मात्र, सरकारविरोधी आशय असल्याचे कारण देत ती अभ्यासक्रमातून वगळण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कादंबरीचा पुन्हा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. कन्नड आणि इंग्रजी भाषेतही या कादंबरीचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत.

लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाढता दबाव, साहित्याची सामाजिक जबाबदारी आणि मानवी वेदनांचे वास्तव या विषयांवर थेट संवाद घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here