By : Shankar Tadas
चंद्रपूर : जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगारापासून वंचित ठेवून बाहेरील कामगारांना प्राधान्य दिल्या जात असल्याच्या गंभीर तक्रारींची अखेर प्रशासनाने अधिकृत दखल घेतली आहे. दिनांक ०५/०५/२०२६ रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी आमदार वामनराव चटप आणि उपोषणकर्ते रोशन राजाराम हरबडे यांच्या नेतृत्वात स्थानिक रोजगाराचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यात आला.
बैठकीमध्ये वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या विविध माती व आणि कोळसा उत्खनन कंत्राटी कंपन्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या रोजगार धोरणाचे (ELP) उघड उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याऐवजी बाहेरील राज्यांतील कामगारांची मोठ्या प्रमाणात भरती केली जात असल्याने जिल्ह्यात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बैठकीदरम्यान अनेक कंत्राटी कंपन्यांकडून manpower आणि रोजगारासंदर्भातील चुकीची अथवा अपूर्ण माहिती प्रशासनाला सादर करण्यात येत असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकारामुळे स्थानिक बेरोजगार युवकांवर अन्याय होत असून शासनाच्या धोरणालाच हरताळ फासला जात असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या सर्व गंभीर बाबींची दखल घेत जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर यांनी वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड प्रशासनाला अधिकृत पत्र जारी करत महाराष्ट्र शासनाच्या रोजगार धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व कंत्राटी कंपन्यांची manpower माहिती पडताळून स्थानिक युवकांना रोजगार देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रोशन हरबडे यांच्या वारंवार आंदोलने, धरणे, पदयात्रा आणि आमरण उपोषणानंतर प्रशासनाला ही भूमिका घ्यावी लागली असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक युवकांना न्याय मिळाला नाही तर पुढील काळात मोठे जनआंदोलन, न्यायालयीन लढा आणि तीव्र कायदेशीर कारवाई उभारली जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.





