Home
Home गडचांदूर / कोरपणा बोरी नवेगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

बोरी नवेगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

By : Shankar Tadas
कोरपना ( बोरी नवेगाव ) : कढोली खुर्द गट ग्रामपंचायतीमधील बोरी नवेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मेळावा माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेच्या वतीने करण्यात आला.
शासनाच्या निर्देशां नुसार येथे माजी विद्यार्थी संघ गावचे प्रथम पदवीधर तसेच पत्रकार शंकर तडस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला आहे. संघाचे सचिव मुख्याध्यापक उमेश लांजेकर, उपाध्यक्ष शिक्षक साईनाथ कुंभारे, कोषाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अशोक कुडमेथे, तर अरुणाचल प्रदेशात विवेकानंद केंद्र विद्यालयाचे शिक्षक बालाजी वाघमारे यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. शाळेत यावर्षी प्रथमच माजी विद्यार्थी संघाचा मेळावा तसेच सत्कार पत्रकार शंकर तडस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. प्रमुख उपस्थिती सरपंचा निर्मलाताई मरस्कोले यांची होती. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक एकनाथजी पारटकर यांनी केले. सत्कार करण्यात आलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेचे प्रथम विद्यार्थी माजी पोलीस पाटील कोंडूजी आत्राम, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे कर्मचारी चरणदासजी सोयाम, पत्रकार शंकर तडस, शिक्षक बाळाजी बोढे, शिक्षक लक्ष्मणजी आत्राम, शिक्षक बालाजी वाघमारे, शिक्षक साईनाथजी कुंभारे, प्रगतीशील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोकराव कुडमेथे, शाळा कर्मचारी नवनाथजी कुडमेथे, शाळा कर्मचारी संतोषजी मडावी, अंबुजा फाउंडेशन कर्मचारी आशिष रागीट यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. नुकतेच पोलीस सेवेत निवड झालेले सूरज वरपटकर आणि गोपाल वरपटकर यांच्या वतीने आई अंगणवाडी सेविका पुष्पाताई वरपटकर (सांगोळा) आणि आजी सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सीताबाई डवरे यांनी सत्कार स्वीकारला. ग्रामपंचायत सदस्य उमाजी आत्राम यांच्या वतीने त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्या रंजना आत्राम यांनी सन्मानचिन्ह स्वीकारले. एसटी चालक महेंद्र आत्राम यांचा सत्कार त्यांच्या पत्नी शिल्पा आत्राम यांनी स्वीकारला. माजी विद्यार्थिनी शारदाताई मोहितकर (राजुरा) यांचाही सत्कार करण्यात आला.
शाळेच्या प्रगतीसाठी शक्य ते प्रयत्न आणि सहकार्य करण्याची ग्वाही सर्व माजी विद्यार्थ्यांनी दिली. शाळेला पुढील सत्रात प्रोजेक्टर देणार असल्याचे बालाजी वाघमारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
साडेपाचशे लोकवस्ती आणि सव्वाशे कुटूंब असलेल्या बोरी नवेगाव येथे 1964 पासून दुसरीपर्यंत शाळा सुरू झाली. यावेळी प्रथम विद्यार्थी म्हणून कोंडू तुकाराम आत्राम यांचे नाव दाखल खारीज रजिस्टरवर नोंद आहे. सध्या येथे पाचवीपर्यत शिकविले जात असून आजवरच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये बरेच शासकीय कर्मचारी असून काहींनी आपल्या क्षेत्रात चमक दाखवून गावाचा व शाळेचा गौरव वाढविला आहे. कार्यक्रम आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मेघाताई रागीट आणि सर्व सदस्य महिलांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here