लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती
राजुरा (ता. प्र.) : राजुरा शहरासाठी अभिमानास्पद ठरावी अशी कामगिरी करत येथील सैफ समीर पठाण याची ‘खेलो इंडिया’ अंतर्गत राष्ट्रीय सेपकटकरा संघात निवड झाली आहे. या यशामुळे संपूर्ण राजुरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सैफ पठाण हे रामचंद्रराव धोटे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य स्वर्गीय समीर पठाण यांचे सुपुत्र असून सध्या ते चिंतामणी महाविद्यालय, पोंभुर्णा येथे पदवी शिक्षण घेत आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने त्यांनी ‘खेलो इंडिया’ सेपकटकरा स्पर्धेत सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट आणि दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे.
लवकरच जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेपकटकरा स्पर्धेत सैफ पठाण गोंडवाना विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या संघात नाशिकचा सुकुमार तिवारी, नांदेडचा सुद्देश कांबळे, वरोऱ्याचा मंथन दिवटे, नागपूरचा पियुष तसेच गडचांदूरचा प्रितम यांचा समावेश आहे. चंद्रपूर येथील क्रीडा प्रशिक्षक नरेश चंदेल हे संघाचे मार्गदर्शन करत आहेत.
सैफच्या या यशाबद्दल शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राजुरा आणि गोंडवाना विद्यापीठाचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.





