लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती
चंद्रपूर, दि. १० – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ चंद्रपूर येथे भव्य आर्ट गॅलरी (कला दालन) उभारण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा करत समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
बालाजी वॉर्ड येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सव व सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी सांगितले की, माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आर्ट गॅलरी उभारण्याची मागणी केली होती. त्या मागणीचा सन्मान राखत ही घोषणा करण्यात आली असून, या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार होऊन नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला महापौर संगीताताई खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव तसेच माळी समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षण, एकजूट आणि सामाजिक प्रगतीवर भर
आपल्या भाषणात आ. मुनगंटीवार यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय, हक्क आणि संधी पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. “प्रत्येक समाजाची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी सामाजिक एकजूट, नीतिमत्ता आणि बांधिलकी यांवरही विशेष भर दिला.
फुले वंशजांसाठी केलेले प्रयत्न
पुण्यातील भिडे वाडा स्मारकाच्या जतनासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या वंशजांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांना मदत केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
‘भारतरत्न’साठी सातत्यपूर्ण मागणी
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात १७५ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रस्तावाला पाठिंबा मिळवण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठवण्यात आले आहे.
तरुणांना आवाहन
तरुणांनी शिक्षणासोबतच स्टार्टअप, स्वावलंबन आणि नेतृत्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन करत त्यांनी व्यसनमुक्ती, सामाजिक मदत आणि सकारात्मक बदलासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. “व्यक्तीपेक्षा विचार मोठा, विचारापेक्षा समाज मोठा आणि समाजापेक्षा देश मोठा आहे,” या विचारांचा पुनरुच्चार त्यांनी केला.
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक व कलाकारांचे आ. मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले.





