लोकदर्शन चंद्रपूर :👉अविनाश पोईनकर
कवीची संवेदनशीलता ही केवळ वैयक्तिक भावविश्वापुरती मर्यादित न राहता ती व्यापक सामाजिक जाणिवेची अभिव्यक्ती व्हावी. कवी शंकर लोडे यांची कविता सत्तेला प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवणारी असून समाजातील विदारक वास्तवाचे प्रभावी प्रतिबिंब मांडते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले.
अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान आयोजित व स्तंभ पब्लिशिंग हाऊस प्रकाशित कवी शंकर लोडे यांच्या ‘पुढे कसे होईल?’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मा. सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख भाष्यकार म्हणून डॉ. आरेकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे होते. ज्येष्ठ शेतकरी नेते व माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजकुमार मुसणे व डॉ. ज्योत्स्ना मोहितकर उपस्थित होते.
कवी शंकर लोडे हे नाट्यकलावंत व शेतकरी असल्याने त्यांनी शेतीमातीचे प्रश्न, तसेच शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर विषयांवर आपल्या कवितांमधून प्रभावी भाष्य केले आहे. ‘पुढे कसे होईल?’ हा सामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी सत्तेसमोर ठामपणे मांडला असून त्यांच्या कविता सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित परिवर्तनाची दिशा देणाऱ्या आहेत, असे मत वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
कवी लोडे हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अधिकारी म्हणून निवृत्त झाले असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असल्याचे मत रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केले. कवीने विदारक वास्तवाची अस्वस्थता प्रभावीपणे मांडली असल्याचे डॉ. राजकुमार मुसणे यांनी सांगितले. समाजातील विसंगतींच्या पार्श्वभूमीवर ‘पुढे कसे होईल?’ हा सर्वांच्या मनातील प्रश्न कवीने अधोरेखित केला आहे, असे डॉ. ज्योत्स्ना मोहितकर यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रत्नाकर चटप यांनी केले. संचालन गीता देव्हारे यांनी केले तर आभार अविनाश पोईनंकर यांनी मानले.
• कवी संमेलनाने रंगत वाढवली…
प्रकाशन सोहळ्यानंतर दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. डॉ. किशोर कवठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात डॉ. पद्मरेखा धनगर, धनंजय साळवे, कृष्णाजी नागपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंगेश जनबंधू यांच्या प्रभावी सूत्रसंचालनात गोपाल शिरपूरकर, राहुल दहिवले, प्रदीप देशमुख, राम रोगे, प्रवीण आडेकर, अर्जुमन शेख, अर्चना पोटे, सुनील बावणे, नरेंद्र गंधारे, नरेश बोरीकर, प्रवीण तुराणकर, प्रशांत खैरे, स्वप्निल मेश्राम, शुभम वडस्कर आदी कवींनी आपल्या रचना सादर करत संमेलनात रंगत आणली.





