लोकदर्शन 👉मोहन भारती
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी एक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध होत असून नंदविजय फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपनीच्या नवीन जिनिंग व वस्त्रगृहाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम चनाई खुर्द (जेवरा फाटा), ता. कोरपना, जि. चंद्रपूर येथे पार पडणार आहे. गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पारंपरिक पद्धतीने वास्तुपूजन करण्यात येणार असून, त्यानंतर शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर भूषविणार असून उद्घाटन आमदार श्री. सुभाषभाऊ घोटे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी श्री. हसराजजी अहिर, अध्यक्ष, राष्ट्रीय मागास वर्ग आयोग हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक आमदार, माजी आमदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या आधुनिक जिनिंग व वस्त्रगृहामुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, कापसाच्या प्रक्रिया, साठवणूक व विक्रीसाठी स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
नंदविजय फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करण्यात आला असून, हा प्रकल्प त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या भव्य कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





