Home
Home Breaking News *“ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी अडचणीत; सातबारा नोंदी ऑफलाइन घेण्याची काँग्रेसची मागणी”*

*“ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी अडचणीत; सातबारा नोंदी ऑफलाइन घेण्याची काँग्रेसची मागणी”*

लोकदर्शन राजुरा👉मोहन भारती

राजुरा (दिनांक 17डिसेंबर) : राजुरा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्याकडे पुरेशा तांत्रिक सुविधा व साधनसामुग्रीचा अभाव आहे. त्यामुळे शेतमाल पेरेपत्रकाची ऑनलाईन नोंदणी करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. शासनाने सातबारा उताऱ्यामध्ये शेतमालाची नोंद ऑनलाईन पद्धतीने करण्याची प्रक्रिया सुरू केली असली, तरी इंटरनेट सुविधा नसणे, संगणक किंवा स्मार्टफोनचा अभाव आणि तांत्रिक अडचणी यांमुळे अनेक शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शेतमाल पेरेपत्रकाची नोंद सातबारा उताऱ्यामध्ये ऑफलाइन पद्धतीने, म्हणजेच तलाठी कार्यालयामार्फत अथवा संबंधित महसूल कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज स्वीकारून करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केवळ ऑनलाईन प्रक्रियेवर भर दिल्यास अनेक पात्र शेतकरी विविध शासकीय योजना, अनुदान व लाभांपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वास्तव परिस्थितीचा विचार करून ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. अशी सुविधा उपलब्ध झाल्यास शासनाच्या योजना व लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील आणि शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल.

तालुका काँग्रेस कमिटीने प्रशासनाने या विषयाकडे सहानुभूतीपूर्वक पाहून संबंधित यंत्रणेला तातडीच्या सूचना द्याव्यात व योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या मागणीमुळे ग्रामीण भागातील तसेच तांत्रिकदृष्ट्या मागास शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.

यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक अरुणभाऊ धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती विकास देवाळकर, साईनाथ बतकमवार, श्यामराव कोटणाके, बापू धोटे, धनराज चिंचोलकर, आशिफ सय्यद, देवाजी पिपरे, हेमंत झाडे, रोहीत बत्ताशंकर यांच्यासह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here