लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती
राजुरा (दिनांक. 26 नोव्हेंबर 2025) :
राजुरा शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात येत असलेल्या अन्यायकारक इलेक्ट्रॉनिक मीटर विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून अखेर नागरिकांच्या दबावाला शरण जात विद्युत विभागाने जबरदस्तीने मीटर बसविणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे तसेच विधानसभा काँग्रेसचे समन्वयक व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या भेटीला जाऊन या अन्यायाची माहिती दिली. नागरिकांच्या हक्काच्या लढाईत पुढाकार घेत अरुण धोटे यांनी उपकार्यकारी अभियंता, विद्युत उपविभाग, राजुरा कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
यावेळी विभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देत, नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर तात्काळ मागे घेण्याची ठाम मागणी करण्यात आली. नागरिकांनी आरोप केला की हे नवीन मीटर आधीच्या मीटरच्या तुलनेत दोन ते तीन पट वाढीव बील देत असून त्यामुळे गोरगरीब जनतेची प्रचंड पिळवणूक होत आहे.
काँग्रेसच्या या ठाम भूमिकेनंतर अखेर विद्युत विभागाने नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील प्रक्रिया होईल, तसेच जबरदस्तीने कोणालाही इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणार नाही, असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण असून लोकशाही मार्गाने लढलेल्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
आंदोलनावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ देशपांडे, किशोर बानकर, सय्यद जाहीर, रफीक अन्सारी, अजहर सिद्धिकी यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व युवक उपस्थित होते.





