लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती
राजुरा, प्रतिनिधी : वेकोलिच्या गोवरी सेंट्रल खदाणीमुळे मुठरा येथील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या गंभीर समस्येची दखल घेत आमदार देवराव भोंगळे यांनी गुरुवारी (२८ मे) वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य प्रबंधक राजेंद्र ठाकरे, नियोजन अधिकारी श्रीपुरम चक्रवर्ती तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बाधित शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी केली.
गोवरी सेंट्रल खदाणीसाठी मुठरा गावाच्या सभोवतालची ८४ हेक्टर आर. जमीन सुरुवातीला सेक्शन ७ मध्ये समाविष्ट करण्यात आली होती. मात्र नंतर ती सेक्शन ९ मधून वगळण्यात आली. परिसरात मोठ्या प्रमाणावर खाणकाम झाल्याने आणि भविष्यात गावाचे पुनर्वसन होण्याची शक्यता असल्याने खदाणीमधून होणाऱ्या प्रदूषणाचा फटका पिकांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित जमिनीवर शेती करणे कठीण झाले असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली.
या पार्श्वभूमीवर आमदार भोंगळे यांनी संपूर्ण परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून उर्वरित ८४ हेक्टर जमीनही वेकोलिने संपादित करावी तसेच बाधित शेतकऱ्यांना योग्य व हक्काचा मोबदला द्यावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी भाजपा राजुरा ग्रामीणचे महामंत्री हरिदास झाडे, सरपंच करीश्मा बोबडे, शहर महामंत्री सचिन भोयर, नगरसेवक प्रफुल कावळे, राजेश पाटील, संतोष वनकर, प्रकाश जिवने, माया पाटील, शांता दूर्गे, सुनीता आवळे, ललीता देठे, प्रदीप बोबडे, अंकुश कायरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





