लोकदर्शन.👉मोहन भारती
राजुरा | गोंडवाना विद्यापीठाच्या क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्राच्या वतीने आदिवासी क्रांतीचे प्रतीक आणि अन्यायाविरोधातील संघर्षाचे प्रेरणास्थान क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती उत्साहात व शैक्षणिक वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला भवांजीभाई कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक नामदेव कन्नाके तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिनेट सदस्य डॉ. सतीश कन्नाके, तर प्रमुख उपस्थितीत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे, डॉ. नंदाजी सातपुते, सिनेट सदस्या डॉ. शीला नरवाडे, डॉ. राजेंद्र मुद्दमवार, तसेच अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. सत्यनारायण सुदेवाड यांचा समावेश होता.
मार्गदर्शक प्रा. नामदेव कन्नाके यांनी आपल्या प्रभावी भाषणातून बिरसा मुंडा यांच्या कार्याची व्याप्ती उलगडली. ते म्हणाले की, जल–जंगल–जमीन या प्रश्नांवरील संघर्षापुरतेच बिरसा मुंडांचे कार्य मर्यादित नव्हते; तर शोषण, धर्मांतरण आणि विस्थापन यांच्या विरोधातील त्यांचे लढे भारतीय समाजासाठी दिशादर्शक ठरले. त्यांचे उलगुलान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे क्रांतीबीज असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सतीश कन्नाके यांनी बिरसा मुंडा यांच्या वसाहतविरोधी लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व उलगडले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या संघर्षामुळे भारतीय समाजातील शोषणविरोधी आवाज अधिक बळकट झाला आणि जनजाती समाजात जागृतीची क्रांती घडली.
अध्यासन केंद्राचे प्रस्तावक डॉ. संजय गोरे यांनी बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आढावा घेत अध्यासन केंद्राच्या उद्दिष्टांचे सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. हेमराज निखाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. सत्यनारायण सुदेवाड यांनी मानले.
या कार्यक्रमाला डॉ. प्रिया गेडाम, डॉ. नरेश मडावी तसेच विद्यापीठाचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक-सांस्कृतिक परंपरेत बिरसा मुंडा जयंतीने संशोधन, इतिहास आणि सामाजिक जाणिवांचा नवा पट उलगडला.





