लोकदर्शन मुंबई | प्रतिनिधी👉 – गुरुनाथ तिरपणकर
मुंबईत कोष्टी समाजाचे स्वमालकीचे सभागृह उभारण्यासाठी समाजाच्या धर्मादाय संस्था आणि समाज बांधवांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे मत कोष्टी व्हिजन ट्रस्ट चे संस्थापक व देवांगन कोष्टा कोष्टी फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव ॲड. सचिन देवांग यांनी व्यक्त केले. असे सभागृह असल्यास, मुंबई व ठाण्यातील समाज बांधवांचे अनेक सामाजिक प्रश्न सुटतील आणि आर्थिक बचतीला हातभार लागेल, असेही ते म्हणाले.
मुंबईतील कुर्ला येथे समस्त कोष्टी समाज सेवा संस्था, मुंबई यांच्या वतीने दिनांक ५ जुलै रोजी आयोजित स्नेह-मेळावा व गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
देवांग म्हणाले, “एखाद्याच्या कार्याचा लेखाजोखा न काढता आपण आपल्या कार्याची उंची वाढवू या, पण जर कोठे समाजहित न जोपासले गेले तर वेळप्रसंगी कठोर भूमिका घेणेही गरजेचे ठरेल. हक्कांसोबत जबाबदारीही महत्त्वाची आहे.”
मुंबईत धावपळीचे जीवनमान आणि वेगळ्या सवयीमुळे बाहेरील वातावरणाशी समरस होणे कठीण जाते. त्यामुळे विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी मुंबईतच वधुवर मेळावे आयोजित करण्यासाठीही समाज संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ९० वर्षांचे समाज भूषण ध्रुतराज तारळकर होते. व्यासपीठावर ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव सरोदे, दानशूर उद्योजक अजय हजारे, संस्थेचे अध्यक्ष निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी कोष्टी व्हिजन ट्रस्ट (के.व्ही.टी.) मुंबई विभागाचे दत्ता कडुलकर व शामल भंडारे यांची विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल के.व्ही.टी. चे कार्याध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते शामल भंडारे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सवित्ता डाके व दिलीपकुमार पाखले यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष संतोष बाबर व लक्ष्मी टकले यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली, तर खजिनदार राजेंद्र लिपारे आणि मनोज कोष्टी यांनी समाज शिक्षणविषयक माहिती दिली.
सूत्रसंचालन अस्मिता भंडारे, गीतांजली नेमाणे आणि सर्वेश कोष्टी यांनी केले.
अध्यक्ष सुधाकर कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रचंड पावसातही मुंबईकरांची उपस्थिती लक्षणीय ठरली.





