कोलामांचा पाठीराखा !

by : Avinash Poinkar

कोलाम विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते विकास कुंभारे यांचे अपघाती निधन झाले. आदिवासीबहूल माणिकगड पहाडावरील कोलाम समाजाच्या संस्कृती व हक्कांविषयी जाणीव-जागृती करुन देण्यात त्यांचे योगदान कुणीही विसरु शकत नाही. कोलाम परिषदांचे आयोजन करुन समाजाला कोलामांच्या प्रश्नांवर चिंतन करायला त्यांनी भाग पाडले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही पहिल्यांदाच कोलामगुड्यावर त्यांनी तिरंगा फडकवला. मंत्रीमहोदयांना कोलामगुड्यांवर आणून कोलामांच्या प्रश्नांवर वाचा फोडली. कोलाम परिषदेचे आयोजन गडचांदूरला करण्याच्या तयारीने ते जिवतीतील कोलामगुड्यांवर बैठका घेवून परतीचा प्रवास करत असतांना त्यांचा अपघात झाला. त्यांनी नुकतीच पत्रकारितेत संशोधन करुन पिएचडी पुर्ण केली होती व पुढील महिन्यात ‘आचार्य’ पदवीने सन्मानित होणार होते. नौकरी सांभाळत पुर्ण वेळ चळवळीला देत कृतियुक्त काम करणारी अशी माणसं गेली तर समाजाची खूप हाणी होते. त्यांच्या कुटुंबियांसह माणिकगड पहाडावरील उपेक्षित, दुर्लक्षित कोलाम समाजाची ही हाणी आहे. विकासजी कुंभारे या लढणा-या कार्यकर्त्याला भावपूर्ण आदरांजली !

••••

दै.दिव्य मराठी वृत्तपत्रात ३ वर्षापुर्वी त्यांच्या कार्य-कर्तृत्वावर प्रकाशित झालेला लेख साभार….

 

कोलाम एक आदिम आदिवासी समुदाय. मुख्यतः गावापासून दोन ते तीन किलोमीटर दूर राहून जंगलांच्या सभोवती वस्ती करून राहणारा. आपण डिजिटल इंडीयाचे कितीही दिंडोरे पिटले तरी यांना काहीही घेणेदेणे नाही. आपली संस्कृती, विचारधारा गहाण ठेवणारी ही मंडळी नाही. दारिद्र्याचे चटके कशाला म्हणावे? हे सोसून देखील त्यांना उमजत नाही. त्यांना आपल्या हक्काची फारशी जाणीव आहे असे नाहीच. पिढ्यानपिढ्या शोषणव्यवस्था सारखी त्यांचे शोषणच करत असल्याचे दिसते. माणूस म्हणून आपण त्यांना जगवणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. ‘स्वाभिमान’ या समुदायाचे मुख्य वैशिष्ट्य. अपार यातना सोसून, कष्ट करून आनंदाने जगणारे आदिवासी कोलाम बांधव खरोखरच जंगलाचे, परंपरेचे, संस्कृतीचे पाईक आहे. साध्याभोळ्या माणसांचं जग कोलाम बांधवांचं जगणं बघून आपण नक्कीच टिपू शकतो.

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासीबहुल राजूरा, कोरपना आणि जिवती तालुक्यात साधारणता चार ते पाच हजार कोलाम बांधव आहे. एकूण पंधराशे कुटुंब या परिसरात वास्तव करतात. राहायला बरोबर घर नाही. प्यायला पाण्याची सुविधा नाही. कित्येक घरांच्या भिंतींना विज नाही. अशा स्थितीत कोलाम बांधवांची अजूनही तक्रार नाही. आपण काळाच्या मागे आहोत, आपल्या जोरावर निवडून येऊन लोक आपलंच शोषण करत आहे, आपले हक्क, अधिकार पायदळी तुडवत आहे, याचे त्यांना स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही काहीच वाटत नाही. ही परिस्थिती पाहून नक्कीच सर्वसाधारण संवेदनशील माणूस हादरतो. या हादरणा-यांपैकीच एक म्हणजे विकास कुंभारे !

कोलामांची प्रामाणिकपणा बघून या हळव्या माणसांचं मन कोलाम बांधवांसाठी इतकं पाझरलं, की त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी मागील काही वर्षापासून स्वतःला समर्पित केलं. या साध्याभोळ्या लोकांसाठी काय करता येतं? या विचारातच त्यांच्या हक्कासाठी एक हजार कोलाम बांधवांना घेऊन जिवतीतील माराई पाटण ते चंद्रपूर अशी पदयात्रा २०१६ साली त्यांनी काढली. यातून कोलाम बांधवात जनजागृतीचे पडसाद उमटले. हक्कासाठी संघर्ष करतांना कोलाम विकास फाऊंडेशन ही सामाजिक दायित्वाची संस्था कार्यकर्ते विकास कुंभारे यांनी कोलामांना घेऊन उभी केली. हल्ली कोरोनाच्या महामारीत कोलाम बांधवांच्या पाठीशी या फाउंडेशनच्या माध्यमातून कुंभारे यांनी जो सेवाभाव जपला, तो निश्चितच प्रेरणादायी आहे.

पहाडावरील जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यातील कोलाम बांधवांच्या सद्यस्थितीत हाताला काम नाही. ते रोजंदारी मजूर म्हणून इतर गावात काम करायला जातात. अगदी काही लोकांना शेती असेल तर फक्त थोडी शेतीची कामे आटोपली की तेसुद्धा कामासाठी बाहेर जातात. कधीकधी अख्खं गाव रिकामं असतं. आपण त्यांना भटके जमाती म्हणू शकत नाही, कारण ते आपल्या मातीशी, गुड्याशी प्रामाणिक असतात. या लोकांची वस्ती साधारणता दोन-तीन कुटुंबापासून जास्तीत जास्त पन्नास-साठ कुटुंबापर्यंत असते. यांचं गाव म्हणजे गुडा. कोलाम गुडा असेच बाकीचे लोक त्यांच्या समुदायांना संबोधतात. आदिवासींचं जग कोलामगुड्यात अनुभवायला मिळते. अजूनही काही गावात जायला रस्ते नाहीत. डोंगर दरीत २०० मीटर खाली उतरून त्यांना पाणी आणावं लागतं. शाळा आहे पण मुलांचे दाखले घेतले की गुरुजी गायब असे चित्र आहे. ही अस्वस्थता विकास कुंभारे या चळवळीच्या कार्यकर्त्यांने टिपली. प्रजासत्ताक दिनाला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे त्यांनी आंदोलन केले. बऱ्याच कोलाम गुड्यात अजूनही प्यायला पाणी नाही, झेंडावंदन केले जात नाही, तर आम्ही कसा प्रजासत्ताक दिन साजरा करायचा ? तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी तात्काळ १३ कोलाम गुड्यात सौर पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. अनेक गावासाठी सातत्याने शासकीय दरबारात मागणी करून, पाठपुरावा करून रस्त्याची सुविधा करण्यात कोलाम विकास फाऊंडेशनला यश आलं.

कोलाम बांधवांचे वैशिष्ट्य म्हणजे कुणी बाहेरची व्यक्ती आले कि ते घाबरतात. पुढे येत नाही. त्यातल्यात्यात त्यांची भाषा कोलामी. सर्वसामान्य माणसाला समजेलच असे नाही. रोजमर्रा संघर्ष हीच त्यांच्या जगण्याची कहाणी. सध्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले असताना कोलाम गुड्यातील बांधवांना याबाबत फारशी माहिती नाही. कोरोना हा देवीचा कोप आहे, इतके अज्ञान पाहायला मिळते. मात्र या काळात कोलाम विकास फाउंडेशनने प्रत्येक कोलाम गुड्यात पोहोचून कोरोनाबाबत जनजागृती केली. नंतर याच बांधवांनी आपल्या गावातून कोणी बाहेर जाणार नाही व बाहेरून कोणी व्यक्ती आपल्या गावात येणार नाही त्याची जबाबदारी घेतली. सरकारने त्यांना राशन दिले. मात्र ते राशन किती दिवस पुरणार ? या कोलाम बांधवांना कुणीही उधारी सामान देत नाही, कारण उधारी चुकवेल अशी त्यांची ऐपत नाही. बाहेर आठवडी बाजार देखील बंद झाले. अशा स्थितीत त्यांना तिखट, मीठ, कांदा व इतर वस्तू मिळेनासे झाल्यात. ही परिस्थिती बघून विकास कुंभारे यांनी कोलाम विकास फाऊंडेशन च्या माध्यमाने ‘कोलाम सहायता अभियान’ राबवले. सोशल मीडियातून कोलाम बांधवांच्या मदतीसाठी आवाहन केले. यात नाम फाउंडेशनतून हरीश इथापे यांनी मदत मिळवून दिली. हैदराबादच्या डोनेट कार्ड या संस्थेने अर्थसहाय्य केले. फ्रेंड स्पोर्टिंग क्लबने मदतीचा हात पुढे केला. सध्यस्थितीत कमी खर्चात विवाह सोहळे ज्यांची पार पडली, त्यात वाचलेला लग्नाचा खर्च म्हणून देखील काही वधू-वर पक्षाने कोलाम विकास फाऊंडेशनला मदत केली. यातून झालेल्या अर्थसहाय्यातून राजुरा, कोरपना जिवती तालुक्यातील कोलाम बांधवांना तेल, तिखट, मीठ, हळद, कांदा, दाळ, गहू, तांदूळ असे जीवनावश्यक महिनाभर पुरेल इतके साहित्य कोलामांच्या दारापर्यंत विकास कुंभारे यांनी कोलाम विकास फाउंडेशनच्या माध्यमातून पोहोचवले. त्यांच्या या सेवाभावी कार्याला मोठा हातभार लावला ते माजी आमदार ॲड.वामनराव चटप व पाथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते ॲड.दीपक चटप यांनी. संपूर्ण कोलाम वस्ती पालथी घालून त्यांनी जवळपास पंधराशे कुटुंबापैकी १२८७ कुटुंबांना राशन देवून दिलासा दिला. जवळपास लोकसहभागातून ७ लाखांपर्यंत रक्कम त्यांनी गोळा करून आदिवासी कोलामांना संकटाच्या काळात जगण्याचा आधार दिला. अशा अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकास कुंभारे यांनी कोलामांसाठी ‘कोलाम सहायता अभियान’ चालवले ते निश्चितच कोलाम बांधवांसाठी कोरोना काळात ‘माणुसकी’ ठरली.

खडकी, रायपुर, कलीगुडा, लेंडीगुडा, भुरी येसापूर, लांबेरी, येल्लापूर, शितागुडा, जनकापूर, घाटराईगुडा, ओळणकप्पी, पल्लेझरी, मरकलमेटा, शेडवाही, कलगुडी, भाईपठार, कोलामगुडा, चिखली कोलामगुडा, मारोतीगुडा, बांबेझरी असे कितीतरी कोलाम वस्ती असलेली गावे, गुडे आहेत. या गुड्यातील कोलाम बांधवांना कोलाम विकास फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांकडे मदतीची याचना करून विकास कुंभारे हा कार्यकर्ता अजूनही झटतो आहे. विकासाच्या मूळ प्रवाहात येथील कोलाम समुदाय ५० वर्ष मागे आहेत, असे कार्यकर्ते कुंभारे सांगतात. कुंभारे हे राजुरा या तालुक्याच्या ठिकाणी राहतात. खरेतर या माणसाला सर्वसामान्य माणसांबद्दल कळवळा वाटावा आणि त्यांच्याबद्दल काम करावं, वारंवार सोयीसुविधा नसणाऱ्या या बांधवांच्या गुड्यावर भेटी देऊन स्वतःचाच वेळ, पैसा खर्ची घालावा म्हणजे हा ध्येयवेडा अवलियाच आहे. या भागात त्यांनी मोठ्या स्तरावर कोलाम परिषदा घेऊन अनेकांचे कोलामांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. त्यांच्या या प्रयत्नाला जरी यश येत असले तरी समाजातील संवेदनशील माणसाने, प्रशासनाने कोलाम बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे.

कोलाम बांधवांना खरेतर त्यांचे स्वातंत्र्य हवे आहे. त्यांचा इतिहास ते स्वतः जपतात. ते समूहापासून दुर का राहत असावेत हा अनुत्तरित प्रश्न आहे. कदाचित इथली व्यवस्था त्यांना सामावून घेत नसेल, हे कारण असू शकते. त्यांना शासनाने घरे बांधून दिली; त्यात ठेकेदारच त्यांच्याकडून काम करून घेऊन गब्बर झाले, हे वास्तव नाकारता येत नाही. घोडनकप्पी फक्त पाच कुटुंबाचा गुडा. येथे शासन कधी पोहोचलेच नाही. विकास कुंभारे यांनी कोलाम विकास फाउंडेशनच्या माध्यमातून या गुड्यावर देखील पायदळ वारी करून अन्नधान्य पोहोचवले. इथल्या कोलाम बांधवांना आरोग्याची, शिक्षणाची, रोजगाराची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ‘सेवाश्रम’ नावाचा प्रकल्प कोलाम विकास फाउंडेशनच्या माध्यमातून साकारण्याचा मनोदय कार्यकर्ते विकास कुंभारे यांचा आहे. खरेतर या ठिकाणी काम करणे आव्हानच आहे. दळणवळणाची सुविधा नाही. मोबाईलला नेटवर्क नाही. अशा परिस्थितीत शासन कोलामांच्या दारी पोहोचावे, यासाठी ते प्रयत्नरत आहेत.

सर्व सोयी सुविधा कोलाम बांधवांना हव्यात, असे नाही. मात्र त्यांचे हक्क, अधिकार त्यांना नक्कीच मिळावे. अशिक्षितपणा आणि अज्ञान ही त्यांची मूळ समस्या असल्याने यावर जनजागृती करणे गरजेचे आहेत. करोनाच्या महामारीत कोलाम गुड्यातील बांधवांचे तेंदुपत्ता, मोहफुल, चारोळी हे गौणउपज संकलनाचे काम देखील हातातून गेले. त्याचा मोठा आर्थिक फटका देखील त्यांना बसला आहे. खायचे काय आणि जगायचे कसे ? हा प्रश्न पिढ्यानपिढ्या पासून तसा त्यांच्यासाठी अनुत्तरितच आहे. या परिस्थितीत कोलाम विकास फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यकर्ते विकास कुंभारे यांनी पुढाकार घेऊन ते कोलामांचे खरे पाठीराखे झाले. असे संवेदनशील पाठीराखे समाजात गरजूंच्या सेवेसाठी निर्माण झाले तर निश्चितच सुजलाम सुफलाम देशाचं स्वप्न आपण साकारू शकतो.

#vikaskumbhare #kolamvikasfaundetion

 

– अविनाश पोईनकर, चंद्रपूर
मो. ७३८५८६६०५९
इमेल : avinash.poinkar@gmail.com

••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here