Home
Home Breaking News *जनतेच्या आरोग्यावर घाला सहन नाही! माणिकगड सिमेंट कंपनीचा घनकचरा प्रकल्प गडचांदूरमध्ये तात्पुरता...

*जनतेच्या आरोग्यावर घाला सहन नाही! माणिकगड सिमेंट कंपनीचा घनकचरा प्रकल्प गडचांदूरमध्ये तात्पुरता बंद* *

*लोकदर्शन गडचांदूर | 👉 : अशोककुमार भगत*

गडचांदूर शहरात माणिकगड सिमेंट कंपनीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांचे जनजीवन अक्षरशः हैराण झाले होते. या गंभीर समस्येवर अखेर गडचांदूर नगरपरिषदेने कडक भूमिका घेत दुर्गंधी पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत कंपनीचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व डम्पिंग यार्डचे कामकाज तात्पुरते स्थगित करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संतप्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दि. ३ जानेवारी २०२६ रोजी नगराध्यक्ष निलेश शंकर ताजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. माणिकगड सिमेंट कंपनीच्या कचरा प्रकल्पामुळे अनेक महिन्यांपासून दुर्गंधी, डास, आजारपण आणि आरोग्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याबाबत नगरपरिषदेकडे सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येत होत्या.

बैठकीत नगराध्यक्ष ताजने यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“कंपनी कितीही मोठी असली तरी गडचांदूरकरांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही. जनतेला वेठीस धरून चालणारा कोणताही प्रकल्प खपवून घेतला जाणार नाही.”

*🔴 दुर्गंधी, आजार आणि निष्काळजीपणा – कंपनीवर ठपका*

बैठकीदरम्यान कचऱ्याच्या अवैज्ञानिक साठवणुकीमुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, डोकेदुखी, मळमळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. कंपनीला तातडीने Bio-Enzyme Spray चा प्रभावी वापर करण्याचे आदेश देण्यात आले असून, एका आठवड्यात परिसर पूर्णपणे दुर्गंधीमुक्त करण्याचे अल्टिमेटम देण्यात आले आहे.

*🔴 घनकचरा प्रक्रिया अपयशी; प्रकल्पाला ब्रेक*

कचऱ्यावर शास्त्रीय प्रक्रिया न केल्यामुळेच दुर्गंधी वाढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व सुधारणा पूर्ण होईपर्यंत माणिकगड सिमेंट कंपनीचा घनकचरा प्रकल्प आणि डम्पिंग यार्ड पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

*🔴 कचरा वाहतुकीवरही निर्बंध*

कचरा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर सांडणारी घाण, घातक द्रव्ये आणि दुर्गंधी याबाबतही गंभीर दखल घेण्यात आली. अनावश्यक कचरा वाहतूक करणारी वाहने शहर हद्दीबाहेर ठेवण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या.

*🔴 प्रदूषण नियमांचे उल्लंघन; MPCB चा अहवाल बंधनकारक*

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले. त्यामुळे MPCB च्या अहवालातील सर्व अटींची काटेकोर अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली असून, संबंधित अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले.

या बैठकीला नगरपरिषदेतील सर्व पक्षांचे गटनेते, सिमेंट कंपनीचे अधिकारी, पोलीस विभाग व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
नगरपरिषद प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे गडचांदूरकरांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी ठामपणे सांगितले की,
“समस्या पूर्णतः सुटेपर्यंत प्रशासन शांत बसणार नाही. गडचांदूरकरांचे आरोग्य आणि पर्यावरण हाच आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे.”

माणिकगड सिमेंट कंपनीच्या दुर्गंधीने त्रस्त नागरिकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार असून, प्रशासनाच्या या ठोस पावलामुळे गडचांदूर लवकरच दुर्गंधीमुक्त होईल, असा विश्वास शहरवासीयांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here