Home
Home नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांसाठी तालुकास्तरावर भांडी वाटप केंद्र सुरू करा 🔸आमदार देवराव भोंगळे...

चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांसाठी तालुकास्तरावर भांडी वाटप केंद्र सुरू करा 🔸आमदार देवराव भोंगळे यांच्या मागणीला कामगारमंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन

By : Shankar Tadas
नागपूर :
राजुरा विधानसभेचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी राज्याचे कामगारमंत्री ना. आकाशजी फुंडकर यांची विधानभवनातील दालनात भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी प्रत्येक तालुका स्तरावर भांडे वाटप केंद्र सुरू करण्याबाबत निवेदन दिले आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ज्या भांड्यांचे वाटप केले जाते, त्याचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली एमआयडीसी परिसरात फक्त एकाच ठिकाणी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता, केवळ एका ठिकाणी वाटप केंद्र असल्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या कामगारांना तिथे येणे अत्यंत गैरसोयीचे व अडचणीचे ठरते. यामुळे कामगारांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून, अनेक कामगारांना लांबचा प्रवास करावा लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

या गैरसोयीचे गांभीर्य अलीकडेच स्पष्ट झाले आहे, कारण या एकमेव केंद्रावर भांडी घेण्यासाठी झालेली अतोनात गर्दी आणि चेंगराचेंगरी या दरम्यान एका महिला कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत खेदजनक असून, यातून कामगारांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी बांधकाम कामगारांची गैरसोय दूर व्हावी आणि भविष्यात असे दुर्दैवी प्रकार घडू नयेत म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर बांधकाम कामगारांसाठी भांडे वाटप केंद्र उभारण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून कामगारांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणीच ही सुविधा उपलब्ध होऊन मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी आमदार भोंगळे यांनी कामगार मंत्र्यांकडे लावून धरली.
कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात असे केंद्र उभारणार असल्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.
DIO Chandrapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here