लोकदर्शन नागपूर👉मोहन भारती
महाराष्ट्र विधानसभेच्या चालू हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संसदीय इतिहासात नवा अध्याय रचला आहे. एकूण ३७ अशासकीय विधेयके विचारार्थ ठेवून त्यांनी विधीमंडळाच्या कामकाजात अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला असून लोकशाही प्रक्रियेला अधिक समृद्ध करणारा हा उपक्रम ठरला आहे.
यापूर्वी ४ जुलै २०२५ रोजी पावसाळी अधिवेशनात एका दिवशी तब्बल ३० अशासकीय विधेयकांची पुरःस्थापना करून त्यांनी संसदीय क्षेत्रात ऐतिहासिक घोडदौड केली होती. त्या विक्रमाचा पुढील टप्पा म्हणून या अधिवेशनातील ३७ विधेयकांचा मोठा संच लक्षवेधी ठरत आहे.
या विधेयकांमध्ये शेतकरी, विद्यार्थी, महिला, ग्रामविकास, पर्यावरण, कामगार व लोकजीवनाशी थेट संबंधित असलेल्या विविध विषयांचा समावेश आहे. सामाजिक समतोल, न्याय्य हक्क, पारदर्शकता आणि शासकीय प्रणालीतील सुटसुटीतपणा या दृष्टीकोनातून विधेयकांची रचना करण्यात आली आहे. यांपैकी काही विधेयके चालू अधिवेशनातच चर्चेस घेतली जाण्याची शक्यता आहे.
अशासकीय विधेयकांना विधीमंडळाच्या कामकाजात विशेष महत्त्व असते. शासनाच्या दृष्टीस पडलेले नसलेले मुद्दे थेट कायद्याच्या स्वरूपात मांडण्याची संधी त्यातून मिळते. अनेकदा ही विधेयके शासनाला धोरणात्मक बदल करण्यास प्रवृत्त करतात, तर काही प्रसंगी त्यांना व्यापक लोकसमर्थनही मिळते.
आ. मुनगंटीवार यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत अशासकीय विधेयकांचा सातत्याने प्रभावी वापर करत लोकहितासाठी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या अनेक विधेयकांमुळे शासनस्तरावर ठोस निर्णय होऊन जनतेच्या प्रश्नांचे समाधान साधले गेल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे त्यांची ही कामगिरी केवळ विक्रमापुरती मर्यादित नसून, जनतेबद्दलची तळमळ आणि संवेदनशीलता यांचे प्रतीक आहे.
या अधिवेशनात विचारार्थ असलेल्या ३७ विधेयकांमध्ये जमीन महसूल, ग्रामविकास, शैक्षणिक शुल्क नियंत्रण, कामगार कल्याण, पर्यावरण संरक्षण, हिंसाचार प्रोत्साहक जाहिरातींना प्रतिबंध, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन, झोपडपट्टी पुनर्विकास, सहकारी संस्था सुधारणा यांसह अनेक महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.
“अशासकीय विधेयकांमुळे नागरिकांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज मिळतो. ही विधेयके केवळ आकडे नाहीत, तर जनतेच्या वास्तविक गरजांवर आधारित आहेत. लोकहितासाठीचा माझा संघर्ष पुढेही अविरत राहील,” असे मत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
हिवाळी अधिवेशनातील त्यांच्या या विक्रमी कामगिरीमुळे विधानसभेतील चर्चांना नवी दिशा मिळण्याची आणि लोकहिताच्या विषयांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





