जात की विकास : चंद्रपूर लोकसभा क्षेत्र

By : राजेंद्र मर्दाने

लोकसभा विशेष
चंद्रपूर : चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदार संघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरीही दोन मातब्बर उमेदवारांमध्येच काट्याची टक्कर होणार असून यात ‘ जात ‘ फॅक्टर महत्त्वाचा ठरतो की ‘ विकासाची गॅरंटी ‘ वरचढ ठरेल, हे निवडणूक जशी जवळ येईल तसे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल.
चंद्रपूर – आर्णी मतदार संघाचा गेल्या दोन निवडणुकीचा विचार केला तर जवळपास ४५ टक्के मते घेणारा उमेदवार विजयी ठरतो, असे निदर्शनास येते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे हंसराज अहिर यांना झालेल्या एकूण मतदानाच्या ४५ टक्के मते मिळाली होती. २०१४ मध्ये तिरंगी लढत झाली होती. २०१९ मध्येही झालेल्या तिरंगी लढतीत बाळू धानोरकर हे काँग्रेसकडून निवडून आलेले राज्यातील एकमेव खासदार होते. त्यांना ५,५९,५०७ (४५.१७ टक्के) मते मिळाली होती तर भाजपचे हंसराज अहिर यांना ५,१४,७४४ ( ४१.५० टक्के ) मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांना १,१२,०७९ म्हणजे ९ टक्के मते मिळाली होती. वंचितचा उमेदवार असतानाही काँग्रेस उमेदवार निवडून आल्याने वंचितचा फटका भाजपला बसला. ४४ हजार ७६३ मताने काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झालेत आणि खासदार बनले. वंचित चे महाडोळे हे माळी समाजाचे असल्याने बौद्ध व माळी समाजाची मते वंचितला मिळाली होती. यावेळी चित्र अगदी उलटे आहे. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने मैदानात उतरविले आहे. धानोरकर यांना उमेदवारी मिळविण्यापासून झालेला
पक्षांतर्गत विरोध त्यांच्या फायद्याचा ठरला व त्यांच्याबद्दल मतदार संघात सहानुभूती निर्माण झाली. त्यांची लढत राज्याच्या राजकारणातील मातब्बर राजकारणी असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचेशी होत असल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासून लोकसभा निवडणूक आपण लढणार नाही, अशी मानसिकता केली होती व ते तसे स्पष्ट बोलतही होते. मात्र, पक्षाचा आदेश येताच त्यांनी दमदार सुरुवात केली. त्यांनी नियोजनबद्धपणे सहाही विधानसभा क्षेत्रातील माहितीचा भांडार आपल्या कार्यालयात उपलब्ध केला असून त्यांची टीम त्यावर दिवसरात्र मेहनत घेत आहे. नियोजनाची अतिशय काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. जवळपास १० लाख मतदारांचा ‘ डेटा ‘ त्यांनी गोळा करून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिला आहे.
सोबतच गेल्या ३० वर्षात चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासाच्या भांडवलावर ते व त्यांचे कार्यकर्ते मतदारांना आपली बाजू पटवून देत आहेत.
दुसरीकडे आमदार प्रतिभा धानोरकर याही नियोजनबद्ध पध्दतीने आपल्या प्रचाराला लागल्या आहेत. धानोरकर आणि मुनगंटीवार यांच्यात थेट लढत होत असल्याने यावेळी मतदार संघात खरी मजा येणार आहे. जेव्हा थेट लढत होते तेव्हा भाजप बॅकफूटवर जाते, हा या मतदार संघाचा इतिहास आहे. त्यातही धानोरकर यांच्या काही जोरदार जमेच्या बाजू आहेत. यात त्यांना पतीच्या निधनानंतर मिळालेली सहानुभूती हा फॅक्टर महत्त्वाचा आणि प्लस करणारा आहे. त्या महिला उमेदवार असल्याने माहिलांमध्ये त्यांच्याबद्दल असणारी ओढ, हीही जमेची बाजू आहे. महत्त्वाचे म्हणजे कुणबी फॅक्टर. या मतदारसंघात जवळपास ६ लाख कुणबी मतदार असून ते निर्णायक ठरतात.
मतदारसंघाचा विचार करून भाजपने निवडणूकीपूर्वी गावपातळीवर कुणबी समाजाच्या व्यक्तींची महत्त्वाच्या पदांवर केलेली नियुक्ती जमेची बाजू आहे. त्यात बहुसंख्य कुणबी बांधव भाजपचे परंपरागत मतदार असल्याने संपूर्ण मतदान धानोरकर यांनाच होईल, असेही नाही. मागच्या निवडणुकीत धानोरकर यांना मोलाची साथ देणारे दिवंगत अधिवक्ता मोरेश्वर टेमुर्डे यांच्यासह अनेक कुणबी बांधव दुखावल्या गेल्यामुळे त्याचा फटका निश्चितच आमदार प्रतिभा धानोरकर यांना बसणार आहे. शिवाय राजूरा विधानसभा क्षेत्रात माजी आमदार वामनराव चटप यांची लढाई काँग्रेसशी असल्याने ते यावेळी काँग्रेसला मतदान करणार का ? असा प्रश्न चर्चिला जात आहे. एकूण परिस्थितीचा विचार करता कुणबी समाज यावेळी मोठ्या प्रमाणावर विभागला जाण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसला मुस्लिम मतदार यावेळी मोठ्या संख्येने मतदान करतील, अशी परिस्थिती दिसते आहे. मुस्लिमबहुल क्षेत्रात फेरफटका मारल्यावर त्यांच्यात मोदी सरकार बद्दल तीव्र नाराजी असल्याचे दृष्टीस पडते.
बौद्ध मतदार या क्षेत्रात 3 लाखाच्या वर असून यावेळी ते कुणाला साथ देतात यावर बरेच काही अवलंबून आहे. अनुसूचित जनजातीची मतदार संख्या अनुसूचित जातीपेक्षा अधिक आहे आणि यांची मते निर्णायक ठरणार आहे. तेली समाजाचा कल यावेळी भाजपकडे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले दखलपात्र उमेदवार नाहीत. ते निवडणूक का लढत आहेत, याची कल्पना बहुसंख्य मतदारांना आहे. ते तेली समाजाचा पाठींबा मिळेल, या आशेवर आहेत पण त्यांच्याबद्दल अनुकूल मत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. वंचितने गेल्या पाच वर्षात कोणतेही जनआंदोलन उभारलेले नाही, पक्षाचे नेटवर्क नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोण? हे समजायला मार्ग नाही. अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेलाही बहुसंख्य बौद्ध बांधवांचा विरोध दिसतो आहे. त्यामुळे ते बौद्ध मतेही घेतात की नाही, ही शंका आहे. मोदी सरकारबद्दल बौद्धांमध्ये नकारात्मक भावना आहे. त्यामुळे बौद्ध बांधव यावेळी काँग्रेसच्या बाजूने झुकले तर धानोरकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल. मात्र या जमेच्या बाजू असल्या तरी प्रतिभा धानोरकर यांच्याबद्दल नकारात्मक विचार करणारेही मतदार संघात मोठ्या प्रमाणात आहेत. कुणबी मतदारांमध्ये त्यांच्या बद्दल पूर्णपणे सकारात्मक प्रतिसाद नाही. त्यांनी बेरोजगारांसाठी विशेष काही केलेले नाही, असे अनेक शिक्षित तरुण बिनधास्त सांगतात. खासदार, आमदार ही पदे एकाच घरात असतांना सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात क्षेत्राचा विकास झालेला नाही. केवळ मोजक्या लोकांचा, बगल बच्च्यांचा विकास झाला, असे बोलल्या जात आहे. पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात आहे. मागील अनेक वर्षांपासून वरोराकर जनतेला साधे नदीचे पाणी मिळत नाही. वरोरा क्षेत्रातच ‘ रत्नमाला चौक ते श्रीनगर सिटी ‘ हा एक किलोमीटरचा मार्ग मागील अनेक वर्षांपासून बनलेला नाही. दगड, खड्डयांमुळे ऑटो वालेही तिथे ये जा करायला बघत नाही, ही शोकांतिका असून जनप्रतिनिधींना लक्ष द्यायला वेळ नाही. शिवाय वरोरा येथील सर्व सामान्यांशी संवाद साधताना आपुलकीचा अभाव, मतदार संघातील प्रतिष्ठित व्यक्ती अथवा त्यांच्या नातलगाचे निधन झाल्यावर पीडित परिवाराला सांत्वना देण्याचे सौजन्य न दाखविणे, या बाबी धानोरकरांच्या विरोधात जाऊ शकतात, असेही मतदार नमूद करतात. ठेकेदार लॉबीही त्यांच्या विरोधात आहे. पक्षांतर्गत विरोध तर आहेच आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सुरुवातीपासून असलेला विरोध त्यांना महागात पडू शकतो. जेष्ठ नेते नरेश पुगलिया हे कुणाला आशीर्वाद देतात, यावर धानोरकरांची भिस्त आहे. पुगलिया यांचे बल्लारपूर पेपर मिल ते आवाळपूर सिमेंट उद्योग क्षेत्रात असलेले प्राबल्य विसरून चालणार नाही. धानोरकर यांच्याकडे कार्यकर्त्यांचे नेटवर्क नाही. निवडणुकीत जे नियोजन हवे ते नसल्याची खंत त्यांच्या जवळील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचे ‘ विकासाचे मॉडेल ‘ मतदारसंघात चर्चेत आहे. भाजपची परंपरागत मते, मोदी सरकारने निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या घोषणा आणि नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व मतदारांना भावणारे आहे. गेल्या ३० वर्षात संसदीय आयुधांच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांनी विविध प्रश्न मार्गी लावलेत, त्यामुळे मुनगंटीवार यांच्याबद्दल मतदार संघात आकर्षण आहे. चंद्रपूर व बल्लारपूर क्षेत्रातील आज जो कायापालट झाला आहे त्याचे श्रेय मुनगंटीवार यांना जाते. शिवाय ते जातीपातीच्या राजकारणात लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांचे मतदार सर्वच जातीधर्मात असल्याने ते वरचढ ठरू शकतात. कार्यकर्त्यांचे भव्य नेटवर्क, गावोगावी असलेली भाजपची फळी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे त्यांना आधार ठरणार आहे. मात्र माजी खासदार हंसराज अहिर हे त्यांना कितपत मदत करतात यावरही बरेच अवलंबून आहे. अहिर यांचे संपूर्ण मतदारसंघात नेटवर्क आहे. त्यांना मानणारा मतदार वणी – आर्णी परिसरात मोठया प्रमाणावर आहेत. शिवाय मागील निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी प्रयत्न केल्याचे शल्य त्यांना सतत बोचते आहे. हाही एक फटका सुधीर मुनगंटीवार यांना बसू शकतो. शिवाय भाऊंच्या विकास मॉडेलवरही चंद्रपुरात चर्चा होते आहे. भाऊंनी ३० वर्षात केवळ रस्ते आणि बागबगीचे यापलीकडे कोणता विकास केला ? असेही विचारले जात आहे. रोजगार निर्मिती करिता सत्तेत असतानाही मोठा उद्योग आणण्यात भाजपला अपयश आले आहे. जे उद्योग सुरू आहेत ते काँग्रेस काळातील आहेत. बल्लारपुरातील पेपर मिल उद्योग आज मरणासन्न अवस्थेत आहे. मात्र,त्याला नवीन झळाळी देण्यात भाऊंना यश आलेले नाही. तरुणांच्या हाताला रोजगार नसेल तर बगीचे आणि क्रीडांगण काय कामाचे ? असे प्रश्न विचारणारेही काही कमी नाहीत. त्यामुळे भाऊंना या नाराजीचा फटका बसू शकतो. सोबतच भाजप सरकारच्या काळात वाढलेली महागाई हा विषय ज्वलंत असून सर्वसामान्य लोकांना तो भेडसावू लागला आहे. हा मुद्दा काँग्रेसने जोरकसपणे उचलला तर भाजपची पंचाईत होऊ शकते. प्रधानमंत्री मोदी यांनी ‘अबकी बार ४०० पार ‘ चा नारा दिला आहे.खासदारांच्या बहुमताच्या जोरावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली घटना बदलविण्याचा मानस भाजपचा आहे, असे भारतीय घटनेबद्दल एका भाजप खासदाराने केलेले वक्तव्य प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री शहा तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी फेटाळले नाही त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि ओ बी सी बांधवांमध्ये भीती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भारतीय घटनेचे संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याने आपसात पटत नसले तरी भाजप नको, असा विचार चौकाचौकात व्यक्त होत आहे. ही बाब भाजपला सर्वात अडचणीची ठरू शकते.
एकंदरीत काँग्रेस व भाजप यांच्यातच थेट लढत असल्याने व वंचितचा उमेदवार दखलपात्र नसल्याने चंद्रपूर – आर्णी क्षेत्रातील निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहचली असून कोण जिंकणार हे स्पष्ट होण्यासाठी पुढील आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *