आनंदवनचे सदाशिवराव ताजने सन्मानित

by : Rajendra Mardane 

*:डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते ऍड. रावसाहेब शिंदे स्मृती सामाजिक पुरस्कार प्रदान

वरोरा :  विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, श्रीरामपूर या संस्थेचा स्व. अँड. रावसाहेब शिंदे स्मृती सामाजिक पुरस्कार आनंदवन येथील ‘ स्वरानंदवन ‘ प्रकल्प प्रमुख, महारोगी सेवा समितीचे  विश्वस्त तथा दिव्यांगांचे प्रेरणास्रोत सदाशिवराव ताजने यांना  डॉ. आमटे यांच्या कार्यालयात  ज्येष्ठ समाजसेवी तथा महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला.

      कार्यक्रमात महारोगी सेवा समिती, आनंदवनचे विश्वस्त डॉ.भारती आमटे, सुधाकर कडू, माधव कविश्वर, आनदवनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पोळ, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुकदेव सुकळे उपस्थित होते.

  यावेळी डॉ. विकास आमटे, डॉ.भारती आमटे, आशाताई ताजने यांचा पुष्पगुच्छ, शाल व पुस्तक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला  तसेच संधी निकेतन अंपगांची कर्मशाळा, स्वरानंदवनाच्या माध्यमातून दिव्यांग,अनाथ, विधवा,परित्यक्ता आदींच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्याच्यात स्वाभिमान जागृत करून जगण्याची नवी उमेद निर्माण करणारे, आनंदवनाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान देणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्व सदाशिवराव ताजने यांना,त्यांनी आजपर्यंत  सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल मंगळवारी एका छोटेखानी कार्यक्रमात डॉ.आमटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, सन्मानपत्र, पुस्तके देऊन  गौरविण्यात आले.  

    प्रास्ताविकात सुकदेव सुकळे यांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानाची भूमिका विशद केली. श्रद्धेय बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून केलेल्या अतुलनीय कार्याला आधुनिकीकरणाची जोड देत डॉ. विकास आमटे यांनी नवनवीन सफल प्रयोग करून आनंदवनाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यात आनंदवनातील सेवाभावी कार्यकत्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. सामाजिक क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल प्रतिष्ठानतर्फे आतापर्यंत ५ मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले आहे. आनंदवनातील सदाशिवराव ताजने यांनी सामाजिक क्षेत्रात सेवाभावी व समर्पित भावनेने केलेली कामे आणि त्यांनी दिव्यांगासाठी केलेली सेवा लक्षात घेऊन त्यांना प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

     डॉ. विकास आमटे यांनी  श्रीरामपूर येथील शिंदे परिवार, भाऊ काका आगाशे व अन्य मान्यवरांचा आनंदवनाप्रती असलेल्या जिव्हाळा, प्रेम यावर प्रकाश टाकला. त्यांनी ‘  श्रीरामपूर पॅटर्न ‘  नाव कसे पडले याबाबतची माहिती दिली. नवीन पिढीतील लोकांनी श्रीरामपूर व आनंदवनातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. अनेक लोक आनंदवनाचे ‘कॉपी राईट’ उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले.  

        सत्काराला उत्तर देताना ताजने म्हणाले की, श्रीरामपूर वासियांच्या हृदयात मागील अनेक दशकांपासून आनंदवनाप्रती आस्था व प्रेम आहे. रावसाहेब शिंदे यांच्या काळात व तद्नंतरही  श्रीरामपूरकरांचे आनंदवनातील लोकांना भरभरून प्रेम मिळाले. त्यांच्याच सहकार्याने ‘ श्रीरामपूर पॅटर्न ‘ प्रसिद्धि झोतात आला. या पुरस्कारासाठी माझी निवड करुन खास आनंदवनात येऊन डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केल्याबद्दल प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुकदेव सुकळे व टीमचे आभार व्यक्त करीत हा पुरस्कार आनंदवनाला समर्पित करतो, असे ताजने यांनी सांगितले.

       यावेळी ताजने यांच्या सन्मानपत्राचे वाचन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले.

    कार्यक्रमात बाबासाहेब बुरकुले सुमित लटमाळे, ओंकार म्हमाणे ( श्रीरामपूर )  पांडुरंग वासेकर,आनंदराव  दरेकर, भानुदास भरकारे,अनिल ठाकरे,आनंदवन मित्र मंडळाचे  सचिव राजेंद्र मर्दाने उपस्थित होते.

    संचालन सुकदेव सुकळे यांनी केले तर आभार उज्ज्वला बुरकुले यांनी मानले.

#aanandvanwarora #सदाशिवरावताजने # drvikasaamte

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *