नारंड्याच्या प्रसिद्ध शंकरपटाला अभूतपूर्व प्रतिसाद

by : Shankar Tadas
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक जुना म्हणजे जवळपास 100 वर्षाची परंपरा असलेला कोरपना तालुक्यातील नारंडा येथील शंकरपट 13 ते 15 जानेवारी असा तीन दिवस आयोजित करण्यात आलेला आहे. कोरोना संकटाचा काळ वगळता जवळपास 100 वर्षापासून हा पट तीळ संक्रांतीच्या मुहूर्तावर सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी तर या शंकरपटाला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. 100 पेक्षा अधिक बैलजोड्यांनी आज 14 जानेवारी रोजी या शर्यतीत भाग घेतला. पहिल्या दिवशी 40 बैल जोड्या शर्यतीत उतरल्या होत्या. 15 जानेवारी शेवटचा असून भरपूर स्पर्धक भाग घेतील व विजेते घोषित केले जातील असे आयोजकांनी सांगितले. नारंडा येथील देवस्थान कमिटी अंतर्गत शंकरपट आयोजन समिती या शर्यतीचे आयोजन करीत असते. यावर्षी चंद्रपूरच नव्हे तर यवतमाळ, वर्धा जिल्हा तसेच आंध्रप्रदेशातूनही बैलजोड्यानी या स्पर्धेत भाग घेतला. मागील दोन-तीन वर्षाच्या खंड पडल्यानंतर यावर्षी उत्साह असणे स्वाभाविकच होते. त्यातही मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ आणि फोटोचा प्रसार झाल्यामुळे प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. पटाच्या निमित्ताने येथे नाटकाचे ही आयोजन केले जाते. यापूर्वी कबड्डी स्पर्धा ही घेण्यात आली. हे तिन्ही उपक्रम शेतकऱ्यांना आवडीचे असून त्यांचा उत्साह वाढवणारे आहे. स्पर्धेत सहभागी जोडीला प्रत्येक वेळी पाचशे रुपये प्रवेश फी असते. त्या माध्यमातून मंडळाला आर्थिक लाभ मिळतो. शंकरपटाचे आयोजन सोपे काम नसते. वेळेवर कोणतेही अघटित घडण्याची शक्यता असते. इतक्या मोठ्या गर्दीला सांभाळणे कठीण जाते. त्याकरिता पोलिसच नव्हे तर गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने येथे बंदोबस्तात सहभागी झालेला होता. अशा रीतीने हजारोच्या संख्येने उपस्थित राहून परिसरातील नागरिकांनी या प्रसिद्ध शंकरपटाचा आनंद लुटला. 15 जानेवारी रोजी एकूण तीन गटातील बैल जोड्यांना प्रत्येक गटासाठी पाच बक्षिसे दिली जातील. याशिवाय व्यक्तिगत बक्षिसे सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांकडे बैलजोड्या दिवसेंदिवस कमी होत असल्या तरी शंकरपटात बैल उतरवण्याकरिता विशेष बैलजोड्या मोठी किंमत मोजून तयार केल्या जातात. स्पर्धेत बैल जोडी हाकण्यासाठी धुरकऱ्याचे विशेष महत्त्व असते. त्याला धीटपणा आणि कौशल्य पाहिजे. म्हणून एका मिनिटातसाठी धुरकरी नेमायचा म्हणजे त्याला किमान पाचशे रुपये द्यावे लागते. बैलजोडी दाणेने न जाता भरकटली तर बैलांना आणि धुरकऱ्याला इजाही होऊ शकते. पट बघणाऱ्याला सुद्धा सांभाळून राहावे लागते. म्हणून मोठा बंदोबस्त इथे लावलेला असतो. अगदी दिवसभर अत्यंत उत्साहाचं असं वातावरण येथे पाहायला मिळते.

पहा आमचे युट्युब चॅनेल

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *