भावकी आटपाडी विलास खरात यांचा अप्रतिम असा लेख भारत चव्हाण,प्राध्यापक,

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

एका गांवात कोंडीबा व अनुसया हे दापत्य राहात असत. सदर गांवात साधारणपणे सातशे आठशेच्या आसपास लोक राहत होते. कोंडीबा हा गवंडी कामाचा व्यवसाय करीत असत. कोंडीबा गावालगत असणाऱ्या बौद्ध समाज्याच्या वस्तीत राहत होता. सदर समाज्याची पस्तीस ते चाळीस घरे होती. समाज्यास पूर्वीच्या काळी गांवाच्या डोंगरालगत इनामी वतनी जमिनी मिळालेल्या होत्या. परंतु पाण्याअभावी जमिनी पडीक असल्यामुळे गांवात म्हणावा तसा कामधंदा नसलेमुळे बरेच लोक रोजगारासाठी शहरात गेले होते. सदर समाज्याचे लोक गांवी गवंडी काम, मजुरी, शेतमजुरी इत्यादी कामे धंदे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. सदर गांवात कोंडीबा आपल्या बौद्ध समाज्यातील भावकीत मिळून मिसळून वागत, राहत असलेमुळे कोंडीबाने पुढाकार घेवून भावकीतील मंडळीना हाताशी धरून समाज्यातील मोकळ्या जागेत सर्वांनी मिळून समाज मंदिराची इमारत बांधली होती. दर महिन्याच्या पौर्णिमेला बौद्ध समाज मंदिरात एकत्र येवून बुद्ध वंदना, भीम वंदना सामुदायिक पणे म्हणत असत. गांवाच्या शाळेत समाज्यातील सर्व मुले-मुली शाळा शिकत होती . कोंडीबा व अनुसयाची मुले सुरेश व रंजना ही सुद्धा शाळेमध्ये शिकत होती.
कोंडीबा हा गवंडी कामात पटाईत असलेमुळे गांवात व आसपासच्या दहा-बारा गावांत आपल्या भावकीतील गवंडी व मजुरांना घेवून घराचे बांधकामाचे मक्ते घेत असत. इतर वेळी विहिरीचे दगडी कड्याचे बांधकाम , गुरा जनावराचे गोठे इत्यादी बांधकामे बिनचूक करून देत असत. कोंडीबा सदर भागात कला कसुरीचा बिनतोड , पटाईत तरबेज गवंडी म्हणून मान्यता पावला होता. अनेक घरे ,वाडे ,इमारती बांधलेल्या होत्या . कोंडीबाने घर बांधकामाचा व्यवहार घर मालकाबरोबर केले नंतर घर किती लांबी , रुंदी, उंचीचे , किती खणाचे , माळवदी, अगर पत्र्याचे बांधावयाचे आहे. या बाबतीत गावातील चार चौघात व्यवहार ठरवून घर मालकाकडून उच्चल म्हणून रुपये घेवून त्या कामाचा पूर्ण विचार करून इमारत बांधकामासाठी लागणारे दगड,वाळू, सिमेंट ,लाकूड, दारे , खिडक्या लोखंड इत्यादिसाठी गांव गाड्यातील सुतार ,लोहार, गवंडी,मजूर, बैलगाडीवान इत्यादींना उच्चल रक्कम देवून बांधकामच्या जागेवर साहित्य पोहच झालेवर , घराचा पाया काडून बांधकाम पूर्ण करून देत असत. कामावरच्या मजुरांना रविवारच्या आठवडी बाजारासाठी सर्वाना मजुरीचे पैसे देणेचे काम कोंडीबा प्रामाणिकपणे करीत असत.
कोंडीबाचे घर हे वडिलार्जित जुने भेंड्याच्या बांधकामाचे छपराचे घर होते. पावसाळ्यात घर गळत असत. त्यामुळे गवंडी कामाच्या रोजगारातून मिळालेल्या पैशातून घराच्या जुन्या भेंड्याच्या मातीतील भिंती व छप्पर काढून नवीन दगडी भिंती तयार करून घरावर लोखंडी अॅगल टाकून पत्रा बसविला होता. त्यामुळे पावसाळ्यात घर गळणे बंद झाले होते. त्यामुळे कुटुंबाच्या निवाऱ्याची सोय झाली होती . गावातील प्राथमिक शाळेत सुरेश व रंजना ही बहिण भाऊ जात होती. दोन्ही मुले शाळेत चांगल्या मार्कानी दरवर्षी पास होत होती. अनुसया ही सुद्धा कोंडीबाने घेतलेल्या बांधकामावर मजुरीचे काम करून प्रपंचात हातभार लावत होती. सुरेश व रंजनास शिक्षणासाठी लागणारे दप्तर,पेन, वह्या,पुस्तके, पोशाख इत्यादी घेऊन देत असत. दोन्ही मुलावर दोघांचाही अतोनात जीव होता.
एके दिवशी कोंडीबा व अनुसया सायंकाळी कामावरून घरी आले असता घराच्या ओट्यावर सुरेश खाली मान घालून बसला होता रंजना केरसुनीने घर लोटत होती अनुसया स्वयपाकाच्या गडबडीने हातपात धुवून घरात गेली. कोंडीबाने हातातील पिशवी रंजनाच्या हातात दिली. व सुरेशला हाक मारू लागला तरी तो काहीच बोलेना म्हणून त्यांच्या जवळ जाऊन बसले व म्हणाले काय झाले बाळाला आज गप्प बसले आहे मी कामावरून आलो का पळत येऊन माझ्या पायास बिलगत असतोस ? आता गप्प का ? शाळेतल्या पोरांबरोबर भांडण झाले हाय काय ? त्यावर सुरेश काहीच बोलत नव्हता. कोंडीबांने रंजनास विचारले, तुझा दादा बोलत नाही काय झाले आहे ? त्यावर रंजना म्हणाली , मास्तरने त्याला मारले आहे म्हणून तो गप्प बसला आहे ? त्यावर कोंडीबा विचारात पडला व म्हणाला अरेपण कशापाय मारले आहे ? त्यावर रंजना म्हणाली दादालाच विचारा ? त्यावर कोंडीबाने सुरेशच्या पाठीवरून हळुवार हात फिरवत जवळ घेऊन म्हणाला सुरेश मी तुला काही सुद्धा बोलणार नाही मला खरे काय ते सांग ? त्यावर सुरेश कोंडीबाला बिलगत रडत- रडत सांगू लागला मला मास्तरने मुस्काटात मारले आहे. माझा गाल लय दुखतोय बाबा. हे ऐकून कोंडीबाचा जीव खालीवर झाला कोंडीबा मनाशीच विचार करू लागला माझ्या दोन्ही मुलांना मी शिवी सुद्धा देत नाही मारणेतर लांबच राहिले. असा विचार करून सुरेशला म्हणाला तुझी काय चुकी आहे काय ? तू चुकीचे शाळेत वागला आहेस काय ? त्यावर सुरेश म्हणाला बाबा, माझी एक चूक झाली आहे ? मी मास्तरचे काम ऐकले नाही. त्यावर कोंडीबा म्हणाला, काय चूक केली आहेस तू ? काय ऐकले नाही ? मला सर्व स्पष्टपणे काय ते सांग त्यावर सुरेश म्हणाला बाबा, मी मास्तरला किराणा दुकानातून तंबाखूची पुडी आणून दिली नाही म्हणून मास्तरने मारले आहे. बाबा किराणा मालाचे दुकान तुम्ही बांधले आहे दुकानदार तुम्हाला ओळखतो. म्हणून तंबाखूची पुडी दुकानातून आणून दिली नाही. त्यावर कोंडीबा काय समजायचा तो समजला. व आपल्या मुलांची समजूत घालून उद्या मास्तरला भेटून चौकशी करतो असे म्हणून सुरेशला घरात घेऊन गेला. दुसरे दिवशी कोंडीबांनी शाळेत जाऊन गुरुजीची भेट घेऊन म्हणाले माझा सुरेश अभ्यासात कच्चा आहे काय ? त्यावर गुरुजी वरमले व कोंडीबास म्हणाले सुरेशला मारून मी चूक केली आहे त्यावर कोंडीबा म्हणाले जाऊ द्या गुरुजी. माझ्या मुलाचा अभ्यास नीट घ्या. लक्ष ठेवा असे म्हणून कोंडीबा शाळेच्या बाहेर आले व आपल्या कामाकडे जाऊ लागले.
सुरेश व रंजनाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी हायस्कूलच्या शिक्षणासाठी दोघानीही शाळेत प्रवेश घेतले. दोन्ही मुलांना शाळेत जाण्यासाठी सायकली घेऊन दिल्या. तालुक्याच्या शाळेत दोघेही जावू लागले. कोंडीबा व अनुसयास आपल्या मुलांचे कौतुक वाटत होते. हायस्कूलचे शिक्षण पूर्ण झालेवर रंजनाचे लग्न जवळच्या गावच्या मुलाबरोबर समाज्याच्या रितीरिवाजाप्रमाणे भावकी व पै- पाहुण्याच्या उपस्थितीत लग्न सोहळा चांगल्या प्रकारे करणेत आला. नवरा मुलगा मुंबईस कामाला असलेमुळे रंजना काही दिवसानंतर आपल्या नवऱ्याबरोबर मुंबईस जात असताना कोंडीबा व अनुसया व भावकीतील स्त्रियांचे डोळे भरून आले होते.
सुरेशला हायस्कूलच्या शाळेमध्ये चांगले मार्क पडलेमुळे कोंडीबाने भावकीतील जानकार मंडळीशी चर्चा, विचार विनिमय करून सुरेशला शहरातील कॉलेजमध्ये व बोर्डिंग मध्ये अॅडमिशन घेऊन देण्यात आले. सुरुवातीच्या वेळेस सुरेशला शहरात करमत नव्हते. आई व बाबांची व गावची आठवण येत होती. हळूहळू स्थिर स्थावर झालेवर कॉलेजच्या शिक्षणात लक्ष घालून अभ्यास करू लागला. कॉलेज सुटले की बोर्डिंग मध्ये येत असत. मन लावून अभ्यास करू लागला. सुट्टीच्या वेळी गावी येत असत, पुन्हा कॉलेजला जात असे. दरवर्षी चांगल्या मार्काने पास होऊ लागला , अनेक पदव्या मिळवू लागला. कॉलेजात जसा हुशार होता तसा कॉलेजच्या मैदानात सुद्धा खेळाडू म्हणून अप्रतिम होता. सुरेशच्या चांगल्या स्वभावामुळे कॉलेजात त्यांचे अनेक मित्र झाले. त्यांच्याच गावातील अनेक विद्यार्थी त्यांचे जीवाभावाचे मित्र सोबती झाले होते. सुरेश हा शिक्षणामुळे वैचारिक विचार मांडू लागला. त्यांचे विचार सर्वांना पटत होते. काही दिवसांनी सुरेशला सरकारी नोकरी मिळाली. सर्वांनाच आनंद झाला कोंडीबा व अनुसयास अत्यानंद झाला गावभर पेढे वाटणेत आले. गावातील मित्रांनी व भावकीतील मंडळींनी समाज मंदिरात सुरेशचा सत्कार करणेत आला, सर्वांना आनंद झाला. सुरेशला सरकारी नोकरी चांगल्या हुद्याची लागली. कालांतराने आपल्याच सरकारी विभागातील सरकारी अधिकारी असणाऱ्या महिलेशी रजिस्टर पद्धतीने लग्न केले व नव्या आयुष्यास सुरुवात केली. त्याबाबत सुरेशने आपल्या आई -वडील व मित्रांना याची माहिती दिली होती गावात व भावकीत सर्वांना सुरेशच्या लग्नाची माहिती समजली. त्यामुळे कोंडीबा व अनुसयाला सर्वजन लग्नाबाबत अनेक प्रश्न विचारत असत.
अनुसयाच्या जीवाला घोर लागला होता, कोंडीबा गावांत गेला की, सुरेशच्या लग्नाच्या विचाराने तीचे डोके सुन्न होऊन जात असे. गावातील व भावकीतील अनेक माणसाचे शब्द तिला अस्वस्थ करीत असत. एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करून दोघांच्याही अंघोळी झाल्या. व नंतर कोंडीबास चहा करून दिला, सकाळची वेळ होती भाकरीसाठी पीठ मळत असताना अचानक तिच्या चेहऱ्यावर व अंगातून घाम येऊ लागला, कोंडीबा बाहेर खाटेवरती रेडिओवरील सकाळच्या बातम्या ऐकत चहापीत बसला होता. घराच्या बाहेरून त्याची नजर एकदम अनुसयावर गेली, पाहतो तर काय ,परातीत पीठ होते अनुसयाचे पीठाने हात भरले होते, चुलीजवळ भिंतीला लागून डोळे मिटून मान खाली घालून बसली होती. तिची ती अवस्था पाहून कोंडीबा तिच्याजवळ वेगाने धावत गेला, अनुसयाच्या अंगावर हात लावत तिच्या तोंडावरून हात फिरवू लागला तिच्याजवळ बसून बोलू लागला त्यांचे मन घाबरे घुबरे होऊ लागले. अनुसयाने एकवेळ कोंडीबाकडे पाहिले आणि कोंडीबाच्या मांडीवर डोके ठेवून शांतपणे डोळे मिटले व कायमचीच अनुसया झोपून गेली.
कोंडीबाच्या ओरडण्याने भावकीतील बाया माणसे गोळा झाली.कोंडीबाला काहीच सुचेना. एवढ्या दिवस निष्ठेने साथ देणारी आपली बायको डोळे मिटून शांत झोपली आहे, काहीही हालचाल करेना हे पाहून त्यांच्या जीवाची घालमेल होऊ लागली. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे हावभाव दिसू लागले . त्याचे मन पूर्णपणे बैचन झाले,भावकीतील बाया माणसे घरात येवून बसली. तरुण मुलांनी गावात जाऊन सुरेश, रंजना व इतर नातेवाईकांना अनुसया मरण पावल्याची खबर फोनवरून दिली.
सुरेशला आई गेलीची खबर मिळताच त्याला धक्का बसला , मन गलबलून गेले, त्याही अवस्थेत त्याने आपल्या गावातील मित्रांना व पै-पाहुण्यांना निरोप दिला. व खाजगी जीप करून पत्नी व मित्रासह गावी आला. आईला पाहिले नंतर त्यांचे मन भरून आले आपोआप डोळ्यातून अश्रू पडू लागले. आपल्या आईने आपल्यासाठी किती कष्ट, त्रास सहन केला आहे या आठवणीने त्याचे मन गहिवरून गेले. आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून तो रडू लागला. आई गेल्यानंतर त्याला पोरकेपणाची जाणीव होऊ लागली. दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या विचाराने त्याचे मन खिन्न, उदास झाले. थोड्या वेळाने सुरेश शांत झाल्यावर त्याच्या लक्षात आले की माझी आई मृत्यू पावली आहे भावकीतील बाया, माणसे कुठे गेली आहेत ? काय भानगड आहे ? त्याला काय कळेना, सुरेशने आपल्या चुलत भावास विचारले तो पण गप्प झाला, त्यांनी आपल्या वडिलांना विचारले की बाबा भावकी कुठे आहे ? ते का आले नाहीत. त्यांना माहित नाही का ? त्यावर कोंडीबाच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्यामुळे सुरेशचे मन चलबिचल झाले. आपल्या वडिलांना तो पुन्हा विचारू लागला तेव्हा कोंडीबा म्हणाला भावकी का आली नाही त्याचे उत्तर सुद्धा तुझ्या जवळच आहे. त्यावर सुरेश बुचकळ्यात पडला ,त्याच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले तो घरा बाहेर आला व सरळ समाज मंदिराकडे चालत जाऊ लागला.
सुरेश समाज मंदिरांत आल्यानंतर आजूबाजूला थांबलेले, लिंबाच्या झाडाच्या पारावर बसलेले भावकीतील मंडळी समाज मंदिरात येऊन बसली. सुरेशने सर्वांना दोन्ही हात जोडून वंदन केले भावकीतील कारभारी मंडळीतील गणाआबा, सखाराम दादा, येताळातात्या, सिदानाना यांचेकडे पाहत सुरेश म्हणाला,तुम्ही भावकीतील कर्ते माणसे आहात. माझी आई मरण पावली आहे तुम्ही भावकीतील मंडळी का आला नाही ? याचीच मला दुःख वाटते आहे, माझे किंवा वडिलांचे काय चुकले आहे काय ? माझे कडून चुकून भावकीतील कोणाचा अपमान झाला आहे काय ? मला आपण सांगितले तर बरे होईल सुरेश असे म्हणून गप्प उभा राहिला. त्यावर येताळतात्या समाज मंदिरात बसलेल्या भावकीतील सर्व मंडळीकडे पाहात सुरेशला म्हणाला , आम्ही भावकीतील सर्व मंडळी तुझा वडील कोंडीबा सांगत असत त्याप्रमाणे समाज्यात वागत राहत होतो. कोंडीबाचा शब्द कोण मोडत नव्हते. त्या कोंडीबाचा तू पोरगा आहेस, तुला सरकारी नोकरी लागल्यावर भावकीने तुझा सत्कार केला, परंतु तू चूक केली आहेस त्यावर सुरेश म्हणाला मी काय चूक केली आहे ? त्यावर गणाआबा म्हणाला, अनुसयाचे प्रेत स्मशानात घेवून जाऊन अंत्यसंस्कार करणारच आहोत. भावकीची ती जबाबदारी आहे आम्ही तिचे प्रेत ठेवणार नाही. याची दक्षता आम्ही सर्व भावकी घेणार आहोत.
परंतु हा बोलायला दिवस नाही, पण भावकीचे काय म्हणणे आहे ते सांगतो की, भावाकीला विचारात न घेता तू स्वता लग्न केले आहेस याचे उत्तर अगोदर दे ? त्यानंतर सखारामदादा म्हणाले कोंडीबा तुझा बाप समाज्याला सोडून वागत नाही. पण तू भावाकीला लग्नाबाबत विचारले सुद्धा नाहीस, याचेच सर्वांना वाईट वाटते आहे, चार बुकं शिकला म्हणजे लय मोठा झालास काय ? लग्न जमवायला, साखरपुड्याला , लग्नाला सुद्धा बोलावले नाहीस याचाच राग सर्वांना आलेला आहे.म्हणून तू येऊस्तो पर्यंत आम्ही थांबलो आहोत.
अशी चर्चा समाज मंदिरात सुरू असताना बाहेरच्या पारावर गावातील सुरेशचे मित्र बसले होते. त्यांनी सुरेशला बाहेर बोलावून घेतले व विचारले की, भावकी काय म्हणते आहे. त्यावर समाज मंदिरातील सर्व वृत्तांत आपल्या मित्रांना सांगितला त्यावर सर्व मित्र एकमेकांकडे पाहू लागले, त्यातील एक मित्र म्हणाला, “भावकी ही वाटेवरची उणे करी असती ” त्यावर एक मित्र म्हणाला, आपण दहा-बारा जण आहोत आपण सर्वांनी मिळून प्रेतास खांदा देवून प्रेत स्मशान भूमीत घेऊन जाऊया असे म्हणताच बाकीचे मित्र बाजूला झाले. व सुरेशला म्हणाले तुझ्या आईचे प्रेत हे भावकीनेच घेऊन जाऊ दे. आम्ही खांदेकरी झालो तर गावातील लोक आम्हाला नावे ठेवतील व म्हणतील भावकी असताना बाकीच्यांचे काय काम आहे. त्यामुळे भावकी सांगेल तसे वाग. तुझ्या भावकीतील माणसे चांगली आहेत. आम्ही मित्र म्हणून तुझ्यासोबत राहू असा मित्राचा सल्ला ऐकलेमुळे थोडासा विचार करून सर्व मित्रांकडे पाहत सुरेश सरळ समाज मंदिरात भावकीत जाऊन बसला. व म्हणाला भावकी सांगेल तसे मी वागेन माझे चुकले असेल तर मला माफ करा.
त्यानंतर सिदानाना सर्वांना शांत करीत म्हणाला, इथून पुढे अशी चूक कोणीही करू नका जशी दुःखात भावकीची गरज लागते तशी सुखात सुद्धा भावकीची आठवण ठेवत जावा. भावकीची एकीची मूठ असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी याचाच विचार करा आता सुरेशची जास्त परीक्षा घ्यायला नको. पोरग आपलंच आहे त्याने रजिस्टर लग्न केले आहे हे चांगलेच केले आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचा बोध घ्यावा. कोंडीबाचे समाजावर फार उपकार आहेत. चला आता उठा सर्वांनी कामाला लागा. प्रेत स्मशानात घेऊन जायची तयारी करा असा एक प्रकारचा आदेश सिदा नानाने दिल्यावर सर्वजन कोंडीबाच्या घराकडे जाऊ लागले. त्यावेळी सखारामदादा सुरेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले सुरेश एक वेळ कामातील पात सोडली तरी चालेल पण भावकी कधी सोडू नगंस या शब्दामुळे सुरेशच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले. सुरेशने भावकीच्या उपस्थितीत अनुसयाच्या चितेस अग्नी संस्काराचा विधी पार पाडला व भावकी बरोबर घराकडे चालत येऊ लागला.

विलास खरात
आटपाडी
मो.नं.९२८४०७३२७७

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *