प्रश्न सत्तेलाच विचारायचे असतात!

By : Lokdarshan 

सत्तेला प्रश्न विचारणे हे सजग लोकशाहीचे प्रतीक मानल्या जाते आणि ज्या देशातल्या जनतेला प्रश्न पडत नाही ती जनता मृतप्राय झालेली असते वा एकतर ती सत्तेची गुलाम झालेली असते.सत्तेत कोणीही असो सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणे हे जनतेचे काम असते,जनता कायम विरोधी पक्षाचे काम करणारी असली पाहिजे.जनतेला सत्तेला प्रश्न विचारण्याचा मूलभूत अधिकार हे भारताचे संविधान देत असते.या विपरीत जनतेच्या मतांना दडपण्याचे काम एखादी सत्ता करत असेल तर त्या सत्तेचा अजेंडा हा लोकशाही विरोधी असतो हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.जनतेचे मत ज्या सत्तेत अग्रस्थानी नसते ती सत्ता ही हुकूमशाही स्वरूपाची असते,सत्तेचा कारभार पारदर्शी नसेल तर सत्ताधारी जनतेत भांडण लावून,वेळोवेळी जात,धर्म ,पंथाच्या नावे सामाजिक ऐक्य तोडून आपला अजेंडा नेहमीच पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतात.
———————–
✍️उमेश पारखी
–———————-
■एकदा एखादा माणूस व्यक्तिपूजक झाला की त्या व्यक्तीची तार्किक क्षमता नष्ट होते,तो तर्कहीन होऊन जातो,त्याचा सारासार विवेक काम करणे बंद करतो आणि तो व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल कोणतीही गोष्ट ऐकून घेण्याच्या मनस्थितीत राहत नाही. त्याच्या मते पूज्य व्यक्ती हा चुकाच करू शकत नाही ही धारणा त्यांच्या मनात खोलवर बसलेली असते आणि अशा अनेक व्यक्तिपूजक व्यक्तींचा एक समर्थक गट तयार होतो जो सुदृढ लोकशाहीला मारक ठरतो.समजा उमेश नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती तुमच्या मनात घट्ट बसलाय तेंव्हा तुम्ही काय कराल,उमेश हा व्यक्ती कधीच चूक करणारा नसतो का? पण तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल गाढ श्रद्धा तयार झालेली असते तेंव्हा तो चूकच करू शकत नाही हा अंधविश्वास निर्माण होतो,त्याने कितीही चुका केल्या असेल तर तुम्ही त्याची चूक नक्कीच डोळेझाक कराल किंवा त्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न कराल,परंतु उमेशने जे काम केले ते चुकीचे होते की नाही याची चिकित्सा मात्र करणे टाळाल,तुमच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल कोणी इतर काही बोलत असेल आणि हमखास तुमच्या पूज्य व्यक्तीची चूक दाखविणारा जरी असेल तरी तुम्ही त्या व्यक्तीचा तिरस्कार कराल,चूक दाखविणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही द्वेष करायला लागाल आणि नेमकं हेच आजच्या वर्तमान राजकारणात घडून येताना आपणास दिसेल. व्यक्तिपूजक कार्यकर्ते तयार केले जातात,त्यांना पोषक असे वातावरण निर्मित केले जाते,त्यांना पोषक असे साहित्य पुरविले जाते आणि हेच कार्यकर्ते मानेवर सूरी आली तरी आमचाच नेता किती खरा हे समाजावर बिंबविण्याचा प्रयत्न करत असतात,त्याबदल्यात अशा कार्यकर्त्यांची छूटमुट कामे करून तो नेता करून देत असतो.अशी मंडळी स्वतः घातक तर असतात पण समाजालाही अत्यंत घातक असतात.स्वतःच्या डोक्याने विचार करण्याची शक्तीच डोक्यात नसल्याने ते काय करत असतात ते स्वतःच त्यांना समजून येत नाही.
■ते बघ तुझ्या नेत्याने गंगेत मेलेल्या माणसांचा ढीग लावला म्हणून आपण जर त्याला म्हटले तर ते इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीवर बोलतील पण गंगेत मेलेल्या माणसाचे ढीग त्याला दिसणार नाही कारण तो व्यक्ती एवढा व्यक्तिपूजक बनलेला असतो की त्याला त्याच्या नेत्याने केलेली चूक ही चूक वाटतच नाही,वास्तविकता इमर्जन्सी आणि मेलेल्या माणसांचे ढीग या दोन्ही गोष्टी लोकशाहीसाठी मारक होत्या याची चिकित्सा तो करू पाहत नाही.तो सहज समोरच्या माणसाला आपला विरोधी समजून शिवीगाळ करेल. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सत्तेचा एवढा स्वैराचार आणि दुरुपयोग कधी झाला नसेल तेवढा आजच्या घडीला होताना आपणास दिसतोय, लोकशाहीच्या प्रमुख संस्था काबीज केल्या गेल्या,मीडिया विकत घेऊन सत्तेला काय अपेक्षित आहे तेवढच प्रसारण केलं गेलं,श्रीमंत,उद्योजक कसा मोठा होईल आणि खालच्या स्तरातला माणूस खालीच कसा राहील याचा आटापिटा केल्या गेला,ही चातुर्वर्ण्य व्यवस्थेची पुनर्बांधणी आपण लक्षात घेत नसलो तरी ही वाटचाल अगदी त्याच दिशेने चालली आहे,एकदा माणसाचा मेंदू गहाण केला की त्याच्याकडून आपल्याला हवे तसे काम करवून घेता येते आणि तोच अजेंडा एक विशिष्ट वर्ग राबविताना दिसतो आहे,बहुजनातील काही धर्माभिमानी लोकांना सोबत घेऊन इतरांना मानसिक गुलाम कसे करता येईल याचे विस्तृत प्लॅनिंग ठरलेले आहे आणि तीच प्लॅनिंग ते राबवित आहेत.आमच्या साहित्यिकांना पुरस्कार मिळाले आणि तेही त्यांच्या हातून मिळाले की यांची लेखणी त्यांच्या विरोधात लिहिणे थांबविते हे ही एक मानसिक गुलामीचे आणि व्यक्तिपूजेचे एक उदाहरण आहे,भारतावर नेहमीच मूठभर लोकांनी राज्य केले आहे आणि त्याला सर्वस्वी जवाबदार आपण स्वतः आहोत,एक काडी सहज तोडली जाऊ शकते पण एक मोळी तोडलीच जाऊ शकत नाही आणि ही मोळी तयार जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मूठभर लोकं अशीच सत्तास्थानी असतील आणि आपण असेच गुलाम!

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *