लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर, प्रतिनिधी : प्रभारी मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांच्यावरील कथित बोगस निविदा व निधी अपहार प्रकरणाची चौकशी करून एफआयआर दाखल करण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी करूनही नगराध्यक्षांनी सभा न घेतल्याचा आरोप करत गडचांदूर नगरपरिषदेतील ९ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे धाव घेतली आहे.
नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मे २०२६ रोजी नगरपरिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक चतुर्थांशपेक्षा अधिक सदस्यांनी नगराध्यक्षांना लेखी निवेदन देत, तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांच्यावरील कथित बोगस निविदा व निधी अपहार प्रकरणाची चौकशी करून गडचांदूर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्याबाबत विशेष सभा तातडीने बोलावण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ७९(२) नुसार, एक चतुर्थांश सदस्यांनी लेखी मागणी केल्यास नगराध्यक्षांनी १५ दिवसांच्या आत विशेष सभा बोलावणे बंधनकारक आहे. मात्र मागणी करून १८ दिवस उलटल्यानंतरही सभा न बोलावल्याने नगराध्यक्षांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, “मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांना पाठीशी घालण्यासाठी सभा मुद्दाम टाळली जात असून हा कायद्याचा स्पष्ट भंग व कर्तव्यातील कसूर आहे,” असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित कलमानुसार नगराध्यक्षांनी विहित मुदतीत सभा न बोलावल्यास जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःच्या अधिकारात विशेष सभा बोलावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून विशेष सभा बोलवावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
या प्रकरणात जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे गडचांदूर शहराचे लक्ष लागले आहे.





