Home
Home गडचांदूर / कोरपणा गडचांदूर नगरपरिषदेत आणखी एक वाद; नियमबाह्य डॉग शेल्टर बांधकामप्रकरणी FIRची मागणी

गडचांदूर नगरपरिषदेत आणखी एक वाद; नियमबाह्य डॉग शेल्टर बांधकामप्रकरणी FIRची मागणी

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर, प्रतिनिधी : गडचांदूर नगरपरिषदेत कथित नियमबाह्य कामांवरून वाद वाढत असून, पुलाच्या बांधकाम प्रकरणानंतर आता डॉग शेल्टर उभारणीवरून नवीन वाद समोर आला आहे. भाजपा विरोधी नगरसेवक सुरज पांडे व हिमांशु नामवाड यांनी नगराध्यक्ष निलेश ताजने, संबंधित अभियंता व ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनानुसार, गडचांदूर नगरपरिषद हद्दीतील सर्वे क्रमांक २१२/१ या जागेवर मोकाट कुत्र्यांसाठी टीन शेड (डॉग शेल्टर) उभारण्यात आले. मात्र हे बांधकाम कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नगरसेवक सुरज पांडे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे २५०० चौ.फुटांच्या शेडसाठी कोणताही ठराव, तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, कार्यादेश अथवा ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचा दावा केला आहे.

“नगराध्यक्षांनी पदाचा दुरुपयोग करून कलम ४४ चे उल्लंघन करत आपल्या निकटवर्तीय ठेकेदाराला मर्जीने काम दिले. अद्याप बिल अदा झाले नसले तरी नियमबाह्य पद्धतीने काम पूर्ण करून घेणे हा निधी अपहाराचा पूर्वनियोजित कट आहे,” असा आरोप नगरसेवक सुरज पांडे यांनी केला.

या प्रकरणी नगरसेवक सुरज पांडे, हिमांशु नामवाड तसेच भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत नगराध्यक्ष निलेश ताजने, संबंधित ठेकेदार व बांधकाम अभियंत्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १२०(बी), ५११, ४०९ तसेच महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम कलम ४४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सदर प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित नगरसेवकांनी कडक उन्हात घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे व जयंता भोंगळे उपस्थित होते.

भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनीही मुख्याधिकाऱ्यांना इशारा देत, “नगरपरिषदेच्या मालमत्तेचे रक्षणकर्ते म्हणून मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या परवानगीशिवाय इतके मोठे नियमबाह्य काम होणे गंभीर बाब आहे. जर या कामाचे बिल मंजूर झाले तर मुख्याधिकारी स्वतः सहआरोपी ठरतील,” असे म्हटले आहे.

या प्रकरणात मुख्याधिकारी काय भूमिका घेतात आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here