Home
Home गडचांदूर / कोरपणा राजुराचा प्रशासकीय प्रवास : विभागीय मुख्यालय तीनदा बदलले

राजुराचा प्रशासकीय प्रवास : विभागीय मुख्यालय तीनदा बदलले

लोकदर्शन कोरपना 👉जयंत जेणेकर

कोरपना, प्रतिनिधी : राजुरा परिसराचा प्रशासकीय इतिहास अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण राहिला असून, काळानुसार जिल्ह्यांसह विभागीय मुख्यालयांमध्येही अनेकदा बदल झाले आहेत. या बदलांमुळे राजुरा परिसराचा प्रशासनिक प्रवास विविध जिल्हे आणि विभागांतून घडत गेला आहे.

राजुरा परिसराचा सर्वप्रथम समावेश १८७२ मध्ये शिरपूर-तांदूर जिल्ह्यात होता. त्यानंतर १९०५ मध्ये हा भाग आदिलाबाद जिल्ह्यात, १९१३ मध्ये आसिफाबाद जिल्ह्यात आणि १९४० मध्ये पुन्हा आदिलाबाद जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. या संपूर्ण कालावधीत संबंधित जिल्ह्यांचे प्रशासकीय नियंत्रण वारंगल विभागातून चालत होते.

राज्य पुनर्रचनेनंतर १९५६ मध्ये राजुरा परिसराचा समावेश नांदेड जिल्ह्यात करण्यात आला. त्या वेळी नांदेड जिल्हा संभाजीनगर (त्यावेळचे औरंगाबाद) विभागाच्या अखत्यारीत होता. त्यामुळे राजुरा परिसराचे विभागीय मुख्यालय वारंगलवरून औरंगाबाद येथे स्थलांतरित झाले.

यानंतर १९५९ मध्ये राजुरा परिसराचा समावेश नव्याने स्थापन झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा नागपूर विभागात समाविष्ट असल्याने तेव्हापासून आजपर्यंत राजुरा परिसराचे प्रशासकीय कामकाज नागपूर विभागीय मुख्यालयाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे.

अशा प्रकारे राजुरा परिसराने आपल्या इतिहासात वारंगल, संभाजीनगर (औरंगाबाद) आणि नागपूर या तीन वेगवेगळ्या विभागीय मुख्यालयांचा प्रवास अनुभवला आहे. त्यामुळे राजुराचा प्रशासकीय इतिहास विदर्भ, मराठवाडा आणि तत्कालीन हैदराबाद राज्यातील प्रशासनिक बदलांचा महत्त्वपूर्ण साक्षीदार ठरतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here