Home
Home चंद्रपूर “पाणीटंचाईत जनता त्रस्त, सत्ताधारी गोव्यात मस्त” — घुग्घूस नगरपरिषदेसमोर भाजपचे ‘गो गोवा’...

“पाणीटंचाईत जनता त्रस्त, सत्ताधारी गोव्यात मस्त” — घुग्घूस नगरपरिषदेसमोर भाजपचे ‘गो गोवा’ आंदोलन

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

घुग्घूस, दि. २२ :
शहरातील भीषण पाणीटंचाई, बंद पडलेले आरओ प्लांट, रखडलेले कर्मचाऱ्यांचे पगार आणि मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला असताना, जनतेच्या कररुपी निधीतून सत्ताधारी नगरसेवक गोवा दौऱ्यावर गेल्याचा आरोप करत भाजपने आज घुग्घूस नगरपरिषदेसमोर आक्रमक ‘गो गोवा’ आंदोलन छेडले.

नगराध्यक्ष, उप-नगराध्यक्ष आणि काँग्रेसच्या सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशिक्षणाच्या नावाखाली तब्बल २० लाख रुपयांचा निधी खर्च करून गोव्यात मौजमजा करण्यासाठी गेल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. शुक्रवारी सकाळी झालेल्या या आंदोलनात भाजपच्या नगरसेवकांनी नगरपरिषद आवारातच बाहेर वापरण्याच्या पाण्याने अंघोळ करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नगरसेवक विवेक बोढे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “शहर विकास खड्ड्यात गेला असून नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत, मात्र सत्ताधारी जनतेच्या पैशावर गोव्यात ऐश करत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला. नगराध्यक्षांची कॅबिन गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची कामे ठप्प झाल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

उप-नगराध्यक्ष राजुरेड्डी यांच्यावर निशाणा साधताना बोढे म्हणाले की, “स्वतःला वॉटरमॅन म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधी शहरात पाणीटंचाई असताना जनतेला वाऱ्यावर सोडून गोव्याला जातात, हे दुर्दैवी आहे.” शहरातील नळांना पाणी नसणे, शुद्ध पाण्याचे आरओ प्लांट बंद पडणे, पथदिवे न लागणे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणे या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले.

भाजपने यावेळी गंभीर आरोप करत सांगितले की, ‘गोवा वारी’साठीचा खर्च घरपट्टी, पाणीकर, नाली व सिमेंट रस्त्यांच्या निधीतून तसेच गरीब, अपंग आणि निराधार योजनांच्या पैशांतून वळविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून या दौऱ्याच्या खर्चाचा हिशोब जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या आंदोलनात भाजप शहराध्यक्ष संजय तिवारी, गटनेत्या मिना मोरपाका, निरीक्षण तांड्रा, आशिष माशीरकर, वैशाली ढवस, मधू तिवारी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनामुळे घुग्घूसमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here