Home
Home Breaking News चंद्रपूर प्रदूषणावर सरकारचा कडक पवित्रा; थर्ड पार्टी मॉनिटरिंगसह ठोस उपाययोजनांची घोषणा

चंद्रपूर प्रदूषणावर सरकारचा कडक पवित्रा; थर्ड पार्टी मॉनिटरिंगसह ठोस उपाययोजनांची घोषणा

लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती

चंद्रपूर, दि. १७ एप्रिल — चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर राज्य सरकारने अखेर कडक भूमिका घेत ठोस उपाययोजनांची दिशा स्पष्ट केली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज जिल्ह्यात प्रत्यक्ष पाहणी दौरा करत प्रदूषण नियंत्रणासाठी थर्ड पार्टी मॉनिटरिंगची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

विधानसभेत सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या दौऱ्यात ऊर्जानगर परिसरातील Western Coalfields Limited तसेच Chandrapur Super Thermal Power Station येथील कोळसा हाताळणी प्रकल्प आणि कोळसा बंकरमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी करण्यात आली. उघड्यावरून होणारी कोळशाची वाहतूक, हवेत उडणारी राख आणि धूर यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर बेलसणी परिसरातील कोल वॉशरीजमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान आणि जमिनीची हानी याचीही पाहणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या समस्या मंत्री मुंडे यांनी ऐकून घेतल्या. तसेच झरपट नदी परिसरात जाऊन नदीतील प्रदूषण, गाळ साचणे आणि पाण्याच्या गुणवत्तेत झालेली घसरण याचाही आढावा घेण्यात आला.

पाहणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी अनेक ठोस मागण्या मांडल्या. प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र स्थायी समिती गठित करावी, कोल हँडलिंग प्लांट बंदिस्त करावा किंवा पर्यायी व्यवस्था उभी करावी, तसेच शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी त्यांनी मागणी केली. याशिवाय, प्रदूषणाचे प्रमाण जनतेसमोर पारदर्शकपणे मांडण्यासाठी मॉनिटरिंग डिस्प्ले बोर्ड लावण्याची सूचनाही त्यांनी केली.

झरपट नदी पुनरुज्जीवनासाठी ‘निरी’ व आयआयटी पवई यांच्या संयुक्त समितीकडून तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, तसेच ‘मियावाकी’ पद्धतीने ग्रीन बेल्ट विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला.

दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “चंद्रपूरमध्ये प्रदूषणाची तीव्रता अत्यंत गंभीर आहे. काही ठिकाणी प्रदूषण लपवण्याचा प्रयत्न होत असला तरी तो सहन केला जाणार नाही.” शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न देण्याबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.

तसेच, प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत त्यांनी सांगितले की, थर्ड पार्टी मॉनिटरिंगद्वारे प्रदूषण नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल आणि दिलेल्या सर्व सूचनांची ठराविक कालमर्यादेत पूर्तता केली जाईल. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला विविध लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यामुळे चंद्रपूरच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर केवळ चर्चा न राहता प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट झाले असून, पुढील निर्णयांवर जिल्ह्याचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here