लोळदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर येथील विद्यार्थी तथा चंद्रपूर जिल्ह्याचा होतकरू खेळाडू शिवम शेखर उर्फ शमी नंदवानी याने मपुसा (गोवा) येथे पार पडलेल्या हाय-फाय एमएमए चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावून जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
नागपूर येथील धरमपेठ जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्सच्या एमएमए क्लबकडून सहभागी झालेल्या शिवमने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूंशी कडवी झुंज देत आपले कौशल्य, ताकद आणि शिस्तबद्ध सरावाचे दर्शन घडवले. अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक विजय मिळवत त्याने चॅम्पियनचे विजेतेपद पटकावले.
नियमित सराव, प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि अथक मेहनत याच्या जोरावर शिवमने हे यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे केवळ त्याच्या कॉलेजचेच नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्वल झाले आहे.
भविष्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्धार शिवमने व्यक्त केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कॉलेज प्रशासन, प्रशिक्षक, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांकडून शिवम नंदवानीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





