लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तसेच आदिवासी हक्कांच्या संघर्षात आदिवासी जननायकांचे योगदान अमूल्य असून त्यांचा त्याग, शौर्य व अन्यायाविरुद्धचा लढा आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन सिनेट सदस्य डॉ. सतीश कन्नाके यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठच्या आदिवासी अध्यासन केंद्र व शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर येथील राज्यशास्त्र व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने “आदिवासी जननायकांचे योगदान” या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
डॉ. कन्नाके यांनी भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, तंट्या भिल्ल, जत्रा भगत, रघुनाथ शहा आणि शंकर शहा यांसारख्या आदिवासी जननायकांनी इंग्रजांच्या अन्याय व शोषणाविरुद्ध तसेच जल–जमीन–जंगल यांच्या संरक्षणासाठी उलगुलान घडवून आणल्याचे सांगितले. आदिवासी संस्कृती, परंपरा व नैसर्गिक संसाधनांच्या रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंग होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्था अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले, आयोजक व विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राचे सदस्य डॉ. संजय गोरे, तसेच इतिहास विभागप्रमुख डॉ. शरद बेलोरकर उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. संजय गोरे यांनी विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती देत, आदिवासी जननायकांच्या क्रांती व संघर्षाचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी “विद्यापीठ आपल्या गावी” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेले बांबू शिल्प देऊन डॉ. सतीश कन्नाके यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. शरद बेलोरकर यांनी केले, तर आभार डॉ. माया मसराम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. चर्चासत्रास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.





