Home
Home गडचांदूर / कोरपणा भाषा, संस्कृती आणि संवादाचे महत्त्व उलगडणारा एक दिवसीय सेमिनार उत्साहात संपन्न

भाषा, संस्कृती आणि संवादाचे महत्त्व उलगडणारा एक दिवसीय सेमिनार उत्साहात संपन्न

लोकदर्शन 👉मोहन भारती

शरदराव पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, गडचांदुर येथे “लँग्वेज, कल्चर आणि कम्युनिकेशन” या विषयावर एक दिवसीय सेमिनार नुकताच उत्साहात पार पडला. या सेमिनारचे आयोजन महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंग, IQAC समन्वयक, सिनेट सदस्य तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. संजय गोरे उपस्थित होते. सेमिनारच्या मुख्य मार्गदर्शिका म्हणून KIIT विद्यापीठ, भुवनेश्वर (ओडिशा) येथील सौ. स्मृती भारद्वाज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. सुनिल बिडवाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते.

या एक दिवसीय सेमिनारप्रसंगी मुख्य मार्गदर्शिका सौ. स्मृती भारद्वाज यांचा सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शन करताना सौ. स्मृती भारद्वाज यांनी भाषेचे सामाजिक, सांस्कृतिक व संवादात्मक महत्त्व अधोरेखित केले. जागतिकीकरणाच्या युगात प्रभावी संवादकौशल्य किती आवश्यक आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. भाषा व संस्कृती यांचा घनिष्ठ संबंध, संवाद प्रक्रियेत होणारे बदल तसेच तंत्रज्ञानाचा भाषा वापरावर होणारा परिणाम या विषयांवर त्यांनी सविस्तर विवेचन केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात व करिअर घडणीत संवादकौशल्याची भूमिका स्पष्ट करत डिजिटल युगातील भाषिक जबाबदारीवरही त्यांनी भर दिला. मातृभाषा, प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी यांचा संतुलित वापर कसा करावा तसेच संवादातील गैरसमज टाळण्यासाठी भाषिक संवेदनशीलतेचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंग यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक वरकड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुनिल बिडवाईक यांनी मानले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. या सेमिनारमुळे विद्यार्थ्यांना भाषिक जाणीव व प्रभावी संवादकौशल्याबाबत नवी दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here