By : Shankar Tadas
कोरपना : गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच अवैध धंद्याला आळा बसावा म्हणून शासनाने गावोगावी पोलीस पाटील नियुक्त केले आहेत. मात्र, त्यांना न जुमानता बहुतेक गावात जुगार, अवैध दारूविक्री तसेच कोंबड बाजार सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलीस पाटील पदाच्या उपयुक्ततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे ‘दमदार’ आमदार देवराव भोंगळे यांनी अवैध दारू विक्रीबाबत शासन दरबारी प्रश्न उपस्थित करून गांभीर्याने कारवाईची मागणी केली होती. सामान्य गावकरीसुद्धा गावात पत्ते जुगार, कोंबड बाजार आणि अवैध दारूविक्री होऊ नये यासाठी सतत इच्छा व्यक्त करतो. काही ग्रामपंचायती ग्रामसभेत ठराव मान्य करून तहसीलदार आणि संबंधित पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन सदर अवैध धंदे रोखण्याची मागणी करतात. मात्र, या सर्व प्रयत्नाने कोणताही फरक न पडता अनेक गावात अवैध दारू विक्री आणि जुगार सर्रास सुरू आहे. सदर गावचे पोलिस पाटील मात्र हतबल दिसून येत आहे.
शेतकरी बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहे. त्यातच दारू आणि जुगाराच्या व्यसनापायी त्यांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. म्हणून प्रत्येक पोलीस पाटलांना गावातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस विभागाने सक्षम करण्याची गरज व्यक्त होतं आहे.





