Home
Home चंद्रपूर चिंतलधाबा सर्वांगीण विकासाच्या मार्गावर : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्राचे...

चिंतलधाबा सर्वांगीण विकासाच्या मार्गावर : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन व कार्पेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

लोकदर्शन चंद्रपूर👉मोहन भारती

चंद्रपूर – राज्याचे माजी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि विद्यमान आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश मिळत चिंतलधाबा गावाच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळाली आहे. गावातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी ६१.१९ लाखांच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन दिनांक ५ डिसेंबर रोजी त्यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे देखील उद्घाटन झाले असून स्थानिक महिलांसाठी रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमास प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ढवस, सरपंच सौ. शुभांगी कुत्तरमारे, उपसरपंच रोशन ठेंगणे, विनोद देशमुख, राहुल पाल, रवि मरपल्लीवार, अजय मस्के, प्रदीप काथोडे, दशरथ फरकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामुळे गावातील नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा आता त्यांच्या परिसरातच मिळणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढणार आहे. गावाच्या विकासासाठी सरपंच आणि उपसरपंच यांनी मांडलेल्या विविध मागण्यांना आमदार मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

नागरिकांच्या दोन प्रमुख मागण्यांवरही तत्काळ कार्यवाही करण्यात आली आहे. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून बांधकाम विभागाला अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच चिंतलधाबाच्या विजेच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महावितरणसोबत सविस्तर बैठक होणार आहे.

उथळपेठ गावाप्रमाणेच चिंतलधाबा हे महाराष्ट्रातील दुसरे पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे गाव करण्याचा मानस आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आगामी वर्षभरात या प्रकल्पाला गती देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र : महिलांसाठी नवे रोजगारदालन

चिंतलधाबा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि लोकर संशोधन संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयं सहाय्यता बचत गटांसाठी कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथील महिलांना सहा महिन्यांपर्यंत मानधन देण्याची योजना विचाराधीन असून त्यासाठी प्रशिक्षणार्थींची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात आधुनिक आरोग्यसेवेचा मजबूत पाया

कायमस्वरूपी सक्षम आरोग्य सुविधांच्या उद्देशाने आमदार मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात स्मार्ट आरोग्य उपक्रमांना मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. अलीकडेच कळमना येथे २ कोटी ६८ लाखांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उमरी पोतदार येथे ८ कोटी ७५ लाखांच्या प्राथमिक आरोग्य संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. अर्थमंत्री असताना शिर्डी साईबाबा संस्थानमार्फत एमआरआय मशीन, मोबाईल कॅन्सर व्हॅन तसेच अनेक आरोग्य प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे.

चिंतलधाबाच्या विकासासाठी आमदार मुनगंटीवार यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे गावातील आरोग्य, ऊर्जा आणि मूलभूत सोयींच्या उन्नतीला नवी दिशा मिळणार असून गावाच्या प्रगतीचा वेग आणखी वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here